| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा रोहा तालुका येथे सोमवार (दि. 23) सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान महावितरण कंपनी उपविभाग मुरुड कोकबन येथील कनिष्ठ अभियंता ओम विश्वनाथ शिंदे याला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
यातील तक्रारदार याच्या राहत्या घराचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता यातील कनिष्ठ अभियंता ओम शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार लाचेची मागणी केली होती. तडजोड करत 15000 ची लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर त्यांच्या अधिपत्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांनी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी शिंदे याला रंगेहात पकडले.
पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे, नवनाथ चौधरी आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.