महामार्गाबाबत फक्त आश्‍वासने

तारीख पे तारीख झाली फेल

| कोलाड | वार्ताहर |

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील सभेत मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील चौपदरीकरणाचे काम 2018 ला पूर्ण होईल असे सांगितले होते. नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लाईन पूर्ण होईल व डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. परंतु, महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, फक्त आश्‍वासाने, लोकनेत्यांची तारीख पे तारीख झाली फेल अशीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. तर इंदापूर, कोलाड, खांब, सुकेळी खिंड, वाकण येथे संथ गतीने काम सुरु आहे.

या महामार्गाची कामे सुरु असलेल्या ठिकाणी गायब झालेले सर्व्हिस रोड, नियम न पाळताच बनविलेले स्पीड ब्रेकर, रस्त्यासाठी वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे सामान, ठेकेदारावर प्रशासनाचा नसलेला वचक, अशा नियोजनशून्य कारभारामुळे हा मार्ग रखडला आहे. परंतु, याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे. आता तर या महामार्गाचे काम डिसेंबर 2024 अखेर पूर्ण होईल अशी नवीन डेड लाईन देण्यात आली आहे. परंतु, महिदरा नदीवरील पुलाचे काम, उड्डाण पुलाचे काम, मोर्‍यांचे काम अजूनही बाकी असल्यामुळे हे काम या कालावधीत पूर्ण होईल असे वाटत नाही. परंतु याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवाशांना भोगावा लागत आहे.

Exit mobile version