म्हसळ्याच्या कौचाली यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

भूमिपूजन व वर्क ऑर्डर निघून विकासकामे होत नसल्याबाबत नाराजी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यातील संबंध विकोपाला गेले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी देखील भुमीपूजन व वर्क ऑर्डर निघून विकासकामे होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत घरचा आहेर देऊ लागल्याने राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला आहे. म्हसळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नवाब अब्दुल अजीज कौचाली यांनी थेट आमदार अनिकेत तटकरे यांना पत्र देत आपली नाराजी व्यक्त केल्याने जिल्ह्यातून भुवया उंचावल्या आहेत.

नवाब अब्दुल अजीज कौचाली यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आंबेत गणामध्ये अनेक विकासकामे खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आपल्या माध्यमातून झाली आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून अनेक विकासकामांचे भूमिपूजन व वर्क ऑर्डर निघूनही अद्याप कामे झालेलीच नाहीत. तसेच कोणत्याही भुमीपूजन ठिकाणी नावाचे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आंबेत गणातील नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरु आहे कि फक्त नारळ फोडा आणि वाट पहा. अनेक प्रकारची टीका या विभागातून पक्षाच्या कार्यपद्धतीवर होताना दिसते. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी या कामांचा ठेका घेतला आहे. त्यांना या बाबतचे गांभीर्य लक्षात येत नाही. त्यामुळे पक्षाची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. तरी ठेकेदारांना तसेच संबंधित अभियंत्यांना कडक निर्देश देवून विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यास सहकार्य करण्याचे आवाहन देखील कौचाली यांनी पत्रातून केले आहे.

Exit mobile version