लोकसभेच्या मैदानातून ज्योती मेटे यांची माघार

| बीड | वृत्तसंस्था |

बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांच्याशी संपर्क केल्याची चर्चा होती. तर ज्योती मेटे यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे त्या कोणाला पाठिंबा देणार हे ही महत्त्वाचं आहे. बीडमधून महाविकास आघाडीने शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.

Exit mobile version