। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्यावतीने जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.28 ते 30 एप्रिलपर्यंत तीन दिवस येथील मैदानावर कब़ड्डीचे सामने रंगले आहेत. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा प्रौढ पुरुष गट 32 संघ, अलिबाग-रेवस, सागरगड आणि बामणगावं पंचक्रोशी मधील 64 संघ रायगड जिल्हा महिला गट 16 संघ सहभागी झाले होते.
रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन पालमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अॅड.आस्वाद पाटील, समीर नेरूळकर समीर ग्रुपचे एमडी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या स्पर्धेत प्रौढ पुरूष गटात प्रथम क्रमांक श्री गणेश दिवलांग रोख 50 हजार रूपये व चषक, द्वितीय नवजवान पेझारी रोख 30 हजार व चषक, तृतीय नवकिरण भेंडखळ व चतुर्थ जय हनुमान चरी या संघाला रोख 20 हजार रूपये व चषक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच महिला गटात प्रथम कर्नाळा स्पोर्ट पनवेल रोख 30 हजार रूपये व चषक, द्वितीय हिरकणी स्पोर्ट गडब संघास रोख 15 हजार रूपये व चषक तर तृतीय ओमकार वेश्वीव चतुर्थ दिलखुश आवास संघास प्रत्येकी 10 हजार रूपये व चषक देवून गौरविण्यात आले.
तसेच या स्पर्धेमध्ये पंचक्रोशी विजेते ठरले नांदई देवी नांदईचा पाडा रोख रक्कम 40 हजार रूपये व चषक, नागेश्वर आवास रोख रक्कम 20 हजार रूपये व चषक, तर जय हनुमान स्पोर्ट्स पुतुबाईचा पाडा व जय हनुमान वाघोडे या संघास प्रत्येकी 10 हजार रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आला आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसांमध्ये महिलांमध्ये उत्कृष्ठ खेळाडू रचना म्हात्रे, पब्लिक हिरो वृणाली पाटील, उत्कृष्ट चढाई हर्षला नाखवा, उत्कृष्ट पकड सायली पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
पंचक्रोशी गटात तुषार पाटील उत्कृष्ट खेळाडू, शिरीष भगत पब्लिक हिरो, सुमित माने उत्कृष्ट पकड, सर्वेश पाटील उत्कृष्ट चढाई तर प्रौढ गटात अमिर धुमाळ उत्कृष्ट खेळाडू, ॠषिक पाटील पब्लिक हिरो, अमित ठाकूर उत्कृष्ट पकड, बिपीन थळे उत्कृष्ट चढाई यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
झिराडमध्ये कबड्डी स्पर्धा उत्साहात
