अलिबागमध्ये रंगला कबड्डीचा थरार

पीएनपी महाविद्यालयातील पुरुष, महिला संघ विजेता

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग 4 च्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा दि.18 ते 21 दरम्यान अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयाच्या पटांगणात रंगला. पीएनपी महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघाने विजेते पद मिळवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.

महिला कबड्डी स्पर्धेचे उद्धाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह ॲड. आस्वाद पाटील व माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.18 रोजी झाले. पुरुष कबड्डी स्पर्धेचे उद्धाटन जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते झाले. चार दिवसीय कबड्डी स्पर्धेचा आनंद कबड्डीप्रेमींनी मनमुरादपणे लुटला. पुरुष कबड्डी स्पर्धेमध्ये पीएनपी महाविद्यालय अलिबाग यांनी प्रथम, गुरूकुल महाविद्यालय-चिपळूण यांनी द्वितीय तर पतंगराव कदम पेण महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. महिला कबड्डी स्पर्धेमध्ये पीएनपी महाविद्यालय अलिबागच्या संघाने प्रथम, एस.के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांनी द्वितीय व श्री नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालय कोलाडच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते सर्व विजेत्या संघांना प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. सोनाली पाटील, जिमखाना व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. रविंद्र चिखले, ॲड. सचिन जोशी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन निवड समितीचे सदस्य प्रफुल्ल पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Exit mobile version