ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पत्रकारांची निदर्शने
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कडाव गावात एसटी बसथांबा बेकायदेशीररित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी (दि.24) कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत 2 जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची तसेच त्या जागेवरील बांधकाम बद्दल लावण्यात आलेले असेसमेंट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा 10 जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
कडाव गावात 1977-78 साली एसटी महामंडळाने अधिकृत बसथांबा बांधला होता. परंतु, आता विनोद काशिनाथ पवाळी, रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐनकर या तिघांनी संगनमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची तक्रार कर्जत एसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर संबंधित विषयाची बातमी देणारे पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना एसटी थांबा बळकावनारे व्यक्तीकडून मारण्याची धमकी देण्यात आली.त्यामुळे संतप्त होत कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार कडाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहचले. स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय याबद्दल पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.