ग्रामपंचायतीचे स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कडावमधील स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या त्यांच्या मुळावर आल्या आहेत. या गावात नावाजलेले श्री बाल दिगंबर गणेश मंदिर असल्यामुळे या ठिकाणी पाहुण्यांचा सतत राबता असतो. त्याचवेळी या गावाच्या मध्यातून शहापूर-खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे देखील या गावाला महत्व आहे. तसेच, या ठिकाणी असलेल्या डंपिंग ग्राऊंडमुळे स्थानिकांसह पै-पाहुण्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या ठिकाणाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांनी ग्रासले गेले आहे.
कडाव गावात धार्मिक व पर्यटनदृष्ट्या होणारी वाढती वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी विकासकामे होणे अपेक्षित होते. परंतु, राजकीय कुरघोड्या, बेकायदेशीर बांधकामे, वहिवाटीचे रस्ते बंद होणे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. तसेच, शासनाचा अधिकृत असलेला प्रवासी थांबा चक्क गिळंकृत केला असून स्थानिक समाजकंटकांच्या कृत्यांकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर गेली कित्येक वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या मैदानात गावातील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हा परिसर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी भरून गेला आहे. याच परिसरात शिशु मंदिर शाळा, विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने लहान मुले, वयोवृद्ध व रुग्णांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, गावाच्या मध्यवस्तीतील डंपिंग ग्राउंड तत्काळ स्थलांतरित करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार, अनधिकृत बांधकामांना संरक्षण, सार्वजनिक ठिकाणांवर अतिक्रमण, आणि आरोग्याला धोका निर्माण करणारी कचरा व्यवस्थापन प्रणाली या साऱ्यांमुळे कडाव गावाचे सामाजिक व शहरी आरोग्य धोक्यात आले आहे.गावाच्या वाढत्या धार्मिक व पर्यटन महत्त्वाला धरून ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थांचा तीव्र रोषाला सामोरे जाण्याच्या तयारीत रहा, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.
डंपिंग ग्राउंडबाबत लवकरच ग्रामपंचायत मासिक बैठकीत चर्चा केली जाईल. त्यात सरपंच व सर्व सदस्यांकडून योग्य ती चर्चा केली जाईल. तसेच, सदस्य मंडळ जो निर्णय घेतील त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.
प्रेमसिंग गिरासे,
ग्रामपंचायत अधिकारी, कडाव







