इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता; मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होण्याची भीती
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदेने धोकादायक ठरविलेल्या कादरी मंझिलवर अनेक तक्रारीनंतरही अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे धोकादायक इमारत केव्हाही कोसळून मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील बाजारपेठेच्या मध्यभागी कादरी मंझिल इमारत आहे. ही इमारत अत्यंत धोकादायक झाली आहे. या धोकादायक इमारतीचा जीना 2014 साली कोसळला होता. तर इमारतीच्या अर्ध्याहून अधिक भाग पडलेला आहे. पुर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीवर विविध प्रकारची झाडेही उगवली आहेत. यामुळे बाजारपेठेतील वर्दळीच्या ठिकाणी असलेली इमारत कधीही कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने कादरी मंझिल धोकादायक इमारत म्हणून घोषित केली आहे. तसेच इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्यासाठी नोटीसही देण्यात आली आहे.
या धोकादायक इमारतीच्या शेजारीच उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नुरमुल्ला यांची इमारत आहे. नुरमुल्ला यांच्या पत्नी फरहाना नुरमुल्ला यांनीही या धोकादायक इमारतींमुळे धोका निर्माण झाला असल्याची तक्रार उरण नगरपरिषदेकडे केली आहे. तसेच या धोकादायक पडीक इमारतींमध्ये साप, विंचू आदि विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. यामुळे धोकादायक इमारतीमुळे घरी ये -जा करणेही जोखमीचे झाले आहे. अनेकदा तक्रारीनंतरही या धोकादायक इमारतीवर उरण नगरपरिषदेने अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे फरहाना नुरमुल्ला यांनी सांगितले.
