वन विभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गोरख कडवे, अभिजीत कडवेसह तिघांनी अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील वनविभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी सिमेंट विटांचे बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गटविकास अधिकारी यांच्या अहवालानंतर सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. त्यामुळे मिळकतखारच्या कडवे यांचे सदस्य व सरपंचपद अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जगदीश म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार, अलिबाग तालुक्यातील मिळकतखार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 2023 मध्ये जाहीर करण्यात आला होता. 28 ऑक्टोबर 2023 मध्ये सरपंचपदासाठी सविता कडवे, सदस्यपदासाठी अभिजीत कडवे, गोरख कडवे यांनी अर्ज भरले होते. त्यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये व सोबत जोडलेले प्रतिज्ञापत्र आणि हमीपत्र आदी कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मिळकतखार येथील गट क्रमांक 537/2, या वन विभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. त्यांना दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच गोरख कडवे याने वन जागेचा वापर हॉटेल व्यवसायासाठी केला आहे. याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अभिजीत कडवे यानेदेखील वन विभागाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केल्याने त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप जगदीश म्हात्रे यांनी केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करीत शासनाची जमीन बळविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे सदस्य व सरपंचपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अभिजीत कडवे, गोरख कडवे व सविता कडवे यांचे सदस्य व सरपंचपद अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अभिजीत कडवे, गोरख कडवे व सविता कडवे यांनी वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. गोरख कडवेसह अभिजीत कडवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यांचे सरपंच व सदस्यपद रद्द व्हावे अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. परंतु, गटविकास अधिकार्यांसह ग्रामसेविक व वनविभागाकडून अहवाल देण्यास दिरंगाई होत असल्याने या प्रकरणावर सुनावण्यास घेण्यास प्रशासनाला उशीर होत आहे. त्यामुळे ग्रामसेवकाविरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
जगदीश म्हात्रे
तक्रारदार