कळंबोली, भेंडखळ उरण, महाड पनवेल उपांत्य फेरीत दाखल

। अलिबाग । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली, भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण, एसबीसी महाड व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेलच्या संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्‍चित केला आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 12 नामवंत क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. लिग पद्धतीने खेळविण्यात आलेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. 40 षटकांच्या एकदिवसीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण 18 साखळी सामने, एक पात्रता फेरीचा सामना, दोन उपांत्य फेरीचे व एक अंतिम सामना असे एकूण 22 सामने झुंझार युवक मंडळाच्या मैदानावर आयोजित केले गेले आहेत. गुरुवारी (दि.19 मे) पहिला उपांत्य फेरीचा सामना एसबीसी महाड व भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण यांच्या मध्ये होणार असून दुसरा उपांत्य फेरीचा सामना शुक्रवारी (दि.20 मे) एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली विरुद्ध प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यांच्यामध्ये रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि.22 मे) सुनिश्‍चित केला आहे. मुलांच्या बरोबरीने मुलींचादेखील समावेश प्रत्येक संघात आहे. रायगड जिल्ह्यातील प्रतिभावान युवा खेळाडूंना झुंझार युवक मंडळांनी क्रिकेट स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने भविष्यात जिल्ह्यातील युवा खेळाडूंना जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्याचा सराव या स्पर्धेतून होणार आहे.

Exit mobile version