कळंबोली अंडरपास वाहतुकीसाठी खुला

उड्डाणपुलाच्या कामासाठी अडीच महिन्यांपासून बंद
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
उड्डाण पुलाच्या दुरुस्तीसाठी मागील अडीच महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेला सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथील अंडरपास वाहतुकीसाठी अखेर खुला करण्यात आला आहे. यामुळे पनवेलच्या दिशेने कळंबोली वसाहतीत येणार्‍या वाहनांचा वळसा कमी झाला असून, मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जाणार्‍या सीएनजी वाहनाचा कामोठे येथील जवाहर इंडस्ट्रित असलेल्या महानगर गॅस पंपावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथील शिवसेना शाखेसमोर आलेल्या उड्डाण पुलाच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आला होता. अडीच महिन्यांपूर्वी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली होती. याकरिता उड्डाण पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून उड्डाण पुलाखालील पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेत पुलाखाली असलेला अंडर पास वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कळंबोली वसाहतीमधून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या आणि पनवेलच्या दिशेने कळंबोली वसाहतीत येणार्‍या वाहणाचा मार्ग बंद झाला होता. परिणामी, कळंबोली वसाहतीमधून मुंबईच्या दिशेला जाण्यासाठी कळंबोली सर्कल येथून तर पनवेलच्या दिशेने कळंबोली वसाहतीत येण्यासाठी कामोठे वसाहतीजवळली उड्डाण पुलाखालून वळसा घ्यावा लागत होता. उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकी साठी बंद असलेला अंडरपास खुला झाल्याने वाहन चालकांना मारावा लागणार वळसा कमी झाला आहे.

सीएनजी पंपावर जाण्याचा मार्ग खुला
कळंबोली वसाहतीजवळलील उड्डाण पुलालगत असलेल्या जवाहर इंडस्ट्रिअल परिसरात महानगर गॅसतर्फे सीएनजी पंप उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईच्या दिशेने दृतगतीमार्गे पुण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहणासाठी हा शेवटचा सीएनजी पंप आहे. तर पुण्याच्या दिशेने मुंबईकडे येणार्‍या सीएनजी वाहनांकरिता हा पहिलाच सीएनजी पंप आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अंडर पास बंद ठेवण्यात आल्याने पुण्याच्या दिशेने जाणारे सीएनजी वाहन चालक अडचणीत सापडले होते. अंडर पास खुला झाल्याने सीएनजी पंपात जाण्याचा मार्ग खुला झाल्याने वाहन चालकांची अडचण दूर झाली आहे.

Exit mobile version