विकास करा, पण नियोजन करुन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
‘भीक नको, पण कुत्रं आवरा’ अशा प्रकारची म्हण मराठीत प्रचलित आहे. त्याच धरतीवर ‘विकास नको, पण कामं आवरा’ असं म्हणण्याची वेळ कळंबोलीकरांवर आली असल्याचे वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी केले आहे.
पालिकेतर्फे कळंबोली वसाहतीत करण्यात येत असलेल्या कामांचे कोणतेही नियोजन नसल्याने कळंबोलीकरांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा उल्लेख ठाकूर यांनी केला आहे. सिडकोने विकसित केलेल्या कळंबोली वसाहतीचा समावेश पनवेल पालिकेत करण्यात आल्यानंतर वसाहतीमधील रस्ते आणि नाल्यांचे हस्तांतरण पालिकेकडे करण्यात आले आहे. त्यामुळे वसाहतीमधील प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण आणि नाल्यांच्या नूतनीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. करोडो रुपये खर्चून केल्या जात असलेल्या कामांचा फायदा वसाहतीमधील नागरिकांना होणार असला तरी हाती घेण्यात आलेल्या या कामाचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नसल्याचे पाहायला मिळत असून, कंत्राटदाराकडून मनमर्जीपणे सुरु असलेल्या या कामांमुळे वाहतूक कोंडी आणि मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या धुळीच्या त्राचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान
समुद्र सपाटीपासून खोलगट भागात असल्याने कळंबोली वसाहतीत दरवर्षी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात. पालिकेतर्फे सुरु असलेल्या कामांमुळे भविष्यात वसाहतीत पाणी तुंबणार नसल्याची शाश्वती पालिका प्रशासन देत आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस बाकी असल्याने पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेली कामे उरकण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.