गॅसच्या टंचाईमुळे चुल पेटविण्याची वेळ
| नेरळ | प्रतिनिधी |
आखाती देशातील युद्धामुळे इंधन उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील कळंब येथील प्रसिद्ध असलेला बटाटावडा ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आता चुलीवर तळला जात आहे. तरीदेखील या बटाटा वड्यांची चव चाखण्यासाठी ग्राहक पूर्वीसारखी गर्दी करून असतात.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कळंब हे गाव आहे. याठिकाणी आदिवासी भागातील लोकांची लहानशी बाजारपेठ आहे. या ठिकाणी बोरगाव फाटा येथील गुरुनाथ कोंडिलकर यांचा श्री समर्थ कृपा हे चहा नाश्त्याचे दुकान आहे. या दुकानात कळंब भागातील चवदार बटाटा वडा मिळतो. या वड्याची चव घेण्यासाठी असंख्य ग्राहक येत असतात; परंतु, सध्याच्या आखाती देशातील युद्धजन्य स्थितीमुळे इंधन उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर विक्रीसाठी उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आपले हॉटेल बंद करावे लागले आहे. त्याचवेळी काही हॉटेलवाल्यांना आता चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ आली आहे. अशीच वेळ कळंब येथील बोरगाव फाटा येथील प्रसिद्ध असलेल्या बटाटावडा बनवणाऱ्या मालकावर आली आहे. त्यांनी आपल्या हॉटेलात चक्क चूल पेटवली आहे. त्या ठिकाणी विटा मांडून त्यावर चूल पेटवण्याचे काम करीत बटाटे वडे तळण्याचे काम कोंडिलकर हे करीत आहेत.
याबद्दल गुरूनाथ कोंडीलकर यांनी कृषीवलच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे बटाटावडा खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या खुप जास्त आहे. सध्या गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आमच्यावर आली होती. मात्र, आमच्या ग्राहकांनी कशाही प्रकारे वडे बनवून द्या, असे सांगितले. त्यामुळे चुल पेटविण्याची वेळ आमच्यावर आली. दुसरीकडे चुलीचा ज्वाळ जास्त झाल्याने कढई तापल्याने त्यातील तेल अतिशय गरम होते. त्यामुळे काहीवेळा बटाटावडा जास्त लाल बनतो. तर, कधी चुलीमधील लाकडांचा धूर देखील होत असतो. तरीदेखील ग्राहक खुश असतात. त्यामुळे आम्ही चुलीवर बटाटावडा तळण्याचे काम करीत आहोत. गॅस सिलिंडर मिळण्यास अडचणी येत असल्यातरी बटाटावडा आम्ही आनंदाने बनवतो आणि ग्राहक देखील नेहमीप्रमाणे गर्दी करून असतात, असेही गुरूनाथ कोंडीलकर यांनी सांगितले.







