जिल्ह्यात कलिंगडचा हंगाम सुरू

मात्र अवकाळीमुळे उत्पादनात घट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी कलिंगड विक्रीची दुकाने सजली आहेत. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कलिंगडचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र, यंदा कलिंगडच्या उत्पादनात 50 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

पावसाचा हंगाम संपल्यावर रायगड जिल्ह्यातील अलिबागसह रोहा, माणगाव अशा अनेक तालुक्यांमध्ये कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे आणि अधिक मागणी असणाऱ्या या पिकाची लागवड करण्यावर अधिक भर दिली जात आहे. आंब्या बरोबरच कलिंगड लागवड ठिकठिकाणी केली जाते. डिसेंबरला तयार होऊन कलिंगड बाजारात दाखल होतो. परंतु, यावर्षी पावसाचा हंगाम वाढला. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने कलिंगडची लागवड ही लांबणीवर गेली. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा बाजारात फक्त 50 टक्के उत्पादन तयार झाले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कलिंगड बाजारामध्ये दाखल झाले आहे. ठिकठिकाणी कलिंगड विक्रीची दुकाने सजली आहेत. लहान आकारापासून मोठ्या आकाराचे कलिंगड विक्रीसाठी ठेवले जात आहे. अलिबाग- रोहा मार्गासह पेण-अलिबाग, रोहा- महाड, रेवदंडा-मुरुड अशा अनेक मार्गावर नाक्या नाक्यावर कलिंगड विक्रीची दुकाने सजली आहेत. बाजारात कलिंगड दाखल झाले असले, तरी त्याचे उत्पादन फारच कमी आल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मागणी अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कलिंगडचा हंगाम सुरु झाला आहे. कलिंगड खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या कलिंगडची किंमत 50 रुपयांपासून 500 रुपयांत आहे. पर्यटकही कलिंगड खरेदीवर अधिक भर देत आहेत. जिल्ह्यात सकाळी हवेत गारवा असला, तरी दुपारच्या वेळेला उन्हाचे चटके लागत आहे. त्यामुळे कलिंगडचा आस्वाद घेण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. उन्हाळ्यात कलिंगड खाणे पोषक असल्याने कलिंगड खरेदीलाही अधिक मागणी असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version