दोघांची नावे निष्पन्न, तर अन्य सहा नावे गुलदस्त्यात
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांतच दि. 26 डिसेंबर रोजी खोपोली शहरात घडलेली शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून गेली आहे. दरम्यान, 27 डिसेंबर रोजी सकाळी नागोठणे येथून हत्येतील आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकरला पोलिसांनी नागोठणे येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस करत असताना आणखी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची नावे गुलदस्त्यात आहे. दरम्यान, आज दिवसभरात पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली आहे.
खोपोली शहरातील रहाटवडे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे (45) यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता मुलीला शाळेतून सोडून घरी येताना विहारी परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या पाच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांचा खून केला. दरम्यान, मयत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे (22) यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने ही हत्या झाल्याचा आरोप केला आहे. आरोपींमध्ये रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, सचिन चव्हाण आणि इतर चार आरोपी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व प्रवक्ते भरत भगत यांचा कटात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
दि. 26 डिसेंबर रोजी या हत्येनंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या खोपोली पोलीस ठाण्याबाहेर मयत मंगेश काळोखे यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. संतप्त महिला व कार्यकर्त्यांनी आक्रोश करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. दिवसभर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. संतप्त समर्थकांनी काही काळ मुंबई-पुणे मार्गसुद्धा अडवला होता. दरम्यान, या घटनेनंतर रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
यामधील राजकीय नावे आल्यानंतर सुधाकर घारे यांनीसुद्धा या प्रकरणाशी आमचा संबंध नसल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले असता, या हत्येतील मुख्य आरोपींना नागोठणे येथून पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये रवींद्र देवकर व दर्शन देवकर यांच्यासह अन्य सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. मात्र, त्या सहा आरोपींची नावे समजली नसून, अन्य आरोपींचा अधिक तपास पोलीस प्रशासन घेत आहे. या हत्येतील एकूण आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. यासाठी पोलिसांची आठ पथके आरोपींचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत. या घटनेनंतर जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत शांत राहणार नाही, पोलिसांना दोन दिवसांचा अल्टिमेटम आ. महेंद्र थोरवे दिला असून आक्रमक पवित्रा घेतला आहे.





