कळसुबाई शिखरावर, तिरंगा फडकवून वाढदिवस साजरा

। रसायनी । वार्ताहर ।

गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर 5400 फूट इतकी उंची असलेल्या कळसुबाई शिखरावर चढाई करून रायगड जिल्ह्यातील आसरोटी गावचे गिर्यारोहक रोहिदास राघो ठोंबरे, रोशन पांडुरंग ठोंबरे, गौरव ठोंबरे, कराड गावाचे आकाश गोडिवले व प्रसाद जाधव यांनी साडेतीन तासांच्या खडतर प्रवासानंतर कळसुबाई शिखर सर केले.

गिर्यारोहक रोहिदास ठोंबरे हा तरूण मुळचा रायगडचा असून नोकरीनिमित्ताने चौकमध्ये स्थायिक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात गिर्यारोहणाची आवड जोपासली असून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भैरवगड, अलंग, मदन कुलंग, ढाकबहिरी यासारखे अवघड किल्ले यापूर्वी सर केले आहेत. रोहिदास ठोंबरे हे महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यावर जाऊन अभ्यास करत असतात. आतापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक किल्ल्यांवर जाऊन अभ्यास मोहिमा केल्या आहेत.

रोहिदास ठोंबरे हे खालापूर तालुक्यातील चौक आसरोटी गावचे असून शिक्षक म्हणून नवी मुंबई येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल येथे कार्यरत आहेत. याशिवाय ते शिवव्याख्याते असून सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात. त्यांना गड किल्ले संवर्धन व सामाजिक कार्याची आवड आहे. कळसुबाई चढण्याचा अनुभव थरारक होता. रात्री दोन वाजता चढाईला सुरुवात करून पहाटे साडेपाचला त्यांनी कळसुबाई शिखर सर केले. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केले म्हणून थेट आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने कळसुबाई शिखरावर भारतीय तिरंगा फडकवून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. या मोहिमेत त्यांच्यासोबत त्यांचे दुर्गमित्र यांनी भगवी शाल देऊन त्यांचा गौरव केला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गिर्यारोहक आकाश गोडीवले, प्रसाद जाधव, रोशन ठोंबरे, गौरव ठोंबरे व कळसुबाईचे स्थानिक गाईड आनंद बांगर यांनी सोबत केली.

Exit mobile version