। म्हसळा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावात नोव्हेंबर महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पेयजल योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेली सहा वर्षे काळसुरी ग्रामस्थ पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
काळसुरी गावात सन 2004 पासून पथदर्शी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता; मात्र या योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन सध्या पूर्णतः जीर्ण झाली असून वारंवार नादुरुस्त होत आहे. जागोजागी पाईप फुटण्याचा प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी सध्या गावात पिण्याचे पाणी येत नसून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. नाईलाजास्तव काही ठिकाणी दूषित पाणी वापरावे लागत असल्याने मागील एका महिन्यापासून कावीळ, जुलाब यांसारखे पोटाचे आजार लहान मुलांसह अनेक ग्रामस्थांना होत आहेत. तसेच गावात डेंगूचे तीन रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जुनी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांना वारंवार श्रमदान करावे लागत आहे. पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सतत बैठका घ्याव्या लागत असल्याने ग्रामस्थांचे आर्थिक नुकसानही होत आहे.
पेयजल योजनेचे अपूर्ण काम आणि पाणीटंचाईबाबत तालुक्यातील पाणीपुरवठा अधिकारी फुलपगारे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. मात्र या समस्येचे अद्याप निराकरण झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने काळसुरी गावाची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा तालुक्यातील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ग्रामस्थांच्यावतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा काळसुरी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र घोसाळकर, उपसरपंच विनया पेरवी, गाव अध्यक्ष संतोष नाक्ती, पाणीपुरवठा गाव कमिटी अध्यक्ष तुकाराम चाळके, जगदीश घोसाळकर, प्रमोद पेरवी, आकाश पेरवी, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांनी दिला आहे.







