कमलप्रीतचे पदक हुकले

थाळीफेकमध्ये सहाव्या क्रमांकाची कामगिरी
| टोक्यो | वृत्तसंस्था |
थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने कारकीर्दीतील पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहाव्या क्रमांकाची कामगिरी केली. सोमवारी झालेल्या अंतिम फेरीत स्पर्धकांच्या कामगिरीवर पावसाचा फटका बसला. परंतु कमलप्रीतने 63.70 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली.

25 वर्षीय कमलप्रीतने शनिवारी झालेल्या पात्रता स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. पण, पावसामुळे जवळपास एका तासाचे नुकसान झालेल्या अंतिम फेरीत पदकासाठी दावेदारी करू शकणारी कामगिरी तिच्याकडून झाली नाही. तिने तिसर्‍या प्रयत्नात सर्वोत्तम 63.70 मीटर अंतरावर थाळी फेकली. याचप्रमाणे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या कृष्णा पुनियाने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीची तिने बरोबरी साधली.

अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमनने पहिल्याच प्रयत्नात 68.98 मीटर अंतरावर थाळी फेकून सुवर्णपदक जिंकले. जर्मनीच्या क्रिस्टिन पुडेन्झला (66.86 मी.) रौप्य आणि क्युबाच्या विश्‍वविजेत्या यॅयमी पेरेझला (65.72 मी.) कांस्यपदक मिळाले.

Exit mobile version