कमळची वाटचाल एक हजार कोटींकडे- अध्यक्ष नंदकुमार चाळके

| अलिबाग | वार्ताहर |

22 ऑगस्ट रोजी कमळ पतसंस्थेने रू.701 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘कमळ’ हा एक ब्रॅण्ड बनला असून, समाज आपल्याकडे विश्‍वासाने पाहतो आहे. त्यामुळे 1000 कोटी रूपयांचा एकत्रित व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवून आपल्याला वाटचाल करायची आहे, असे उद्गार कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके यांनी काढले.

कमळ पतसंस्थेच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी महिला बचत गटांना केलेले 13 कोटींचे कर्जवाटप व त्यातून संबंधित महिलांच्या उंचावलेल्या जीवनमानाचा उल्लेख केला. तसेच गृहस्वामिनी योजनेद्वारे शेतकरी, गृहिणी, मोलमजुरी किंवा धुणीभांडी करणार्‍या महिलांना कमळने कमाल रू.50,000/-देऊन वाटप केलेल्या 6 कोटी रूपयांचा उल्लेख केला व या योजनेची यशस्विता पाहून कमाल कर्ज रक्कम रू.50,000/- वरून रू.1 लाख करण्यात आल्याचे सांगितले. नवीन योजनांचे सुतोवाच करताना गृहनिर्माण सोसायट्यांसाठी स्वयंपुनर्विकास कर्ज योजना तसेच सौरऊर्जा युनिट उभारणीसाठी 10 टक्के दराने 100 टक्के कर्जपुरवठा करण्याच्या योजनेचा उल्लेख केला.

या सर्व यशस्वितेमागे कोकण पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, सहकार अभ्यासक सतीश पाटील, उपाध्याक्ष मोरेश्‍वर दातार, सचिव लक्ष्मण जुंधारे तसेच व्यवस्थापन मंडळातील सर्व सहकार्‍यांकडून मिळणार्‍या सहकार्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर उपमहाव्यवस्थापक रंजन पाटील, अलिबाग शाखेचे शाखाधिकारी देवेंद्र कारूळकर यांच्यापासून ते संदेश गोंधळी, अक्षय काठे यांच्यापर्यंतच्या कर्मचार्‍यांकडून मिळणार्‍या सहकार्याचा उल्लेख केला.

ही वार्षिक सर्वसाधारणसभा क्षात्रैक्य समाजसभागृह, कुरूळ येथे पार पडली. या सभेस सुमारे 1300 सभासदांनी आपली उपस्थिती नोंदवली. सभा यशस्वी करण्यासाठी कमळच्या सर्व कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली. याप्रसंगी माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत कमळला एका उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल तसेच कमळ सेवा संस्थेतर्फे चालविल्या जाणार्‍या सतीश वासुदेव धारप डायलिसीस सेंटरचे अध्यक्ष राजेश प्रधान यांचा आणि भारतातील सर्व राज्ये बुलेट मोटारसायकलवरून 24000 कि.मी. प्रवास केल्याबद्दल प्राजक्ता जुंधारे हिचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version