कमलाकर साखळे अलिबाग बाजार समिती सभापती

तर, अशोक म्हात्रे उपसभापतीपदी बिनविरोध

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकवल्यानंतर गुरुवारी झालेल्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे कमलाकर साखळे यांची सभापतीपदी, तर उपसभापतीपदी अशोक म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासिन अधिकारी तथा तालुका उपनिबंधक अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणूकीत प्रत्येक अर्जासाठी एकेक अर्जच आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲड आस्वाद पाटील यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.


अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीम्हणून निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत विरोधकांचा धुव्वा उडवित 16 जागांवर शेकापक्ष तर एका जागेवर काँग्रेस आणि एका जागेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य निवडून आले होते. त्यानंतर गुरुवारी सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. सभापती पदासाठी एकमेव कमलाकर साखळे यांनी तर उपसभापतीपदासाठी अशोक म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. विहीत मुदतीत इतर अर्ज न आल्याने पिठासिन अधिकारी तथा तालुका उपनिबंधक अशोक मोरे यांनी अर्ज वाचून दाखवित कमलाकर साखळे यांची तर उपसभापती पदी अशोक म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.

यावेळी कमलाकर साखळे, अशोक म्हात्रे यांच्यासह स्वप्निल पाटील, अनंत पाटील, संजय पाटील, यशवंत भगत, सलीम तांडेल, संध्या पाटील, अशुप्रिता वेळे, गजानन झोरे, अमिताभ भगत, भास्कर भोपी, मुकेश नाईक, अर्चना हंबीर, सुभाष वागळे, खलील तांडेल आदी उपस्थित होते. सभापती पदाची निवड जाहीर होताच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, भरत नांदगावकर यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

Exit mobile version