कामोठे कॉलनी फोरमची महावितरणावर धडक

परिसरातील विद्युत प्रश्‍नांकडे वेधले लक्ष
स्वतंत्र उपकेंद्राची मागणी

। पनवेल । वार्ताहर ।

कामोठे परिसरातील विविध विद्युत प्रश्‍नांकडे महावितरणाचे लक्ष वेधण्यासाठी कामोठे कॉलनी फोरमने महावितरण कार्यालयावर धडक दिली आहे. याप्रसंगी शहरातील वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र उपकेंद्र सुरु करण्याही मागणीही करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील कामोठे परिसर अलीकडच्या काळात शहर म्हणून वेगाने विकसित होत आहे. मात्र नागरी सोयीसुविधांच्या विकासाची गती काहीशी संथ आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, सध्या त्यांच्यापुढे कामोठे विद्युत प्रश्‍न उभे राहिले आहेत.
कामोठे परिसरात विविध ठिकाणी विद्युत पुरठ्याकामी बसविण्यात आलेले एलटी ट्रॉन्सॅफार्मर ड्रीस्ट्रीब्यूशन बॉक्स हे जीर्ण झाले असून, ते गंजलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत आहेत. यातील अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या बॉक्सला जोडून असलेल्या वीजवाहक तारा या काही प्रमाणात फुटपाथवर आल्या आहेत.
याशिवाय या बॉक्सच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे यांची वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करण्यास अडथळा निर्माण होण्यासोबतच एखाद्याप्रसंगी कोणत्याही नागरिकांचा विद्युतप्रवाह करणार्‍या तारांचा जर नकळत स्पर्श झाला तर जीवित हानीची शक्यता निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येकडे महावितरणाचे लक्ष वेधण्यासाठी कामोठे कॉलनी फोरमने भिंगारी येथील कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयात धडक मारली असून, याबाबत तक्रार केली आहे. या समस्येच्या निराकरणासाठी निवेदन देताना कार्यकारी अभियंता सरोदा यांना यासंबंधातील जवळपास पन्नास फोटोंचा अल्बम दाखविण्यात आला.
यानुसार तक्रारीतील गांभीर्य लक्षात घेत सरोदे यांनी कार्यकारी अभियंता सुर्यतळ यांना याकामी आवश्यक त्या कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या निवेदनात करण्यात आलेल्या कामोठे येथे स्वतंत्र उपकेंदांच्या मागणीची दखल घेण्यात आली आहे. याप्रसंगी कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, समन्वयक बापू साळुंखे, डॉ. गारळे, राहुल बुधे, अरुण जाधव, संतोष अलदार, भरत उतेकर, रविंद्र पाधी, सुनिल कदम अणि संदीप इथापे उपस्थित होते.

Exit mobile version