कामोठे कॉलनी फोरमचा निर्धार मेळावा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमतर्फे आयोजित निर्धार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कामोठे शहरातील दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ, प्रामाणिक आणि जबाबदार पर्याय निर्माण करण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.

कामोठे शहरातील पाणीटंचाई, वीज अडचणी, खड्डेमय रस्ते, आरोग्य सुविधा, अग्निशमन केंद्र, मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर कॉलनी फोरमने अनेक वर्षांपासून सातत्याने लढा दिला आहे. या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रस्थापित राजकारणाबद्दल नाराजी निर्माण झाली असून, आता लोक विकासाभिमुख नव्या पर्यायाची अपेक्षा करत आहेत.

मेळाव्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून सुशिक्षित, प्रामाणिक आणि तत्परतेने काम करणाऱ्या उमेदवारांची निवड करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आयोजन कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व्यासपीठावर खारघर कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधू पाटील, महिला अध्यक्षा जयश्री झा, ॲड. समाधान काशीद, बापू साळुंखे, अनिल पवार, पोपट आवारी, निलेश आहेर, जयवंत खरात, प्रवीण भालतडक, गीता कुडाळकर, शुभांगी जाधव, उषाकिरण शिंगे, मुक्ता घुगे, शीतल दिनकर आणि सुप्रिया माने यांची उपस्थिती होती.

Exit mobile version