कांदळे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन

| पेण | प्रतिनिधी |

कांदळेपाडा ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असून, प्रांताधिकार्‍या निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची अपूर्ण कामांबाबात वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित प्रशासनाने चालढकलपणा चालविला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, परिसरातील महिला ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गुरुवारी रात्री उशिरा मा. सरपंच मुरलीधर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणावर संताप व्यक्त केला.

कांदळे, गावालगत तसेच कांदळेपाडा व उचेडे या गावाच्या मधून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गाचे काम कांदळे, कांदळेपाडा व उचेडे हद्दीतील जवळ-जवळ पूर्ण झाले असून, आता काँक्रिटीकरणसुद्धा चालू आहे. परंतु, त्याच महामार्गाच्या बाजूला असणार्‍या या गावांना जोडणारे सर्विस रस्त्यांचे व त्या सर्विस रस्त्याला लागून असणारी गटारे अपूर्ण ठेवण्यात आली असून, ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कांदळेपाडा गावाच्या बाजूनी वडखळकडे जाणार्‍या सर्विस रस्त्याचे काम अजून प्रलंबितच आहे. त्यामुळे कांदळेपाडाच्या बाजूनी पुढे रस्ता नसल्याने भोगद्यातून जाताना पुष्पक हॉटेलपर्यंत मोठ मोठे खड्डे व ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक निघाल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे वडखळ व स्थानिक परिसरातील तरुणांचे नाहक बळी जात आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गेली पाच ते सहा वर्षांपासून पाठपुरावा करुनदेखील हॉटेल पुष्पक ते हॉटेल साईलिलापर्यंतचा सर्विस रोड व सर्विस रोडच्या दोन्ही बाजूची गटारे अपूर्ण स्थितीतच आहेत. तसेच जुन्या रस्त्यालगत असणारी जीवन प्राधिकरणची मुख्य जलवाहिनी या रस्त्याचे काम करत असताना रस्त्यात गेली असून, तिला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे दोन-दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच नाल्यांना असणारे संरक्षण भिंत, जुने गणपती विसर्जन घाट, आमच्या उचेडे शाळेची संरक्षण भिंत व शेतकर्‍यांच्या शेतीचे पाणी जाण्याचा मार्ग या कामांकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे अपूर्ण कामांचा व येत्या पावसाळयाचा विचारकरिता पुन्हा एकदा कांदळेपाडा व कांदळे गावात पुराचे पाणी जाणार व त्याचा त्रास आम्हा ग्रामस्थांना होणार यात शंकाच नाही. सदरील महामार्गालगत ज्या अपूर्ण कामांबाबत आम्ही ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायत कांदळेकडे विचारणा करीत आहोत. त्यानुसार त्यावर ग्रामपंचायत कांदळे यांनी संबंधितांकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगत असून, याबाबत संबंधित ठेकेदार व प्रशासन केलेल्या पत्रव्यवहार व तोंडी तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी अपूर्ण कामे निवडणुकीच्या अगोदर पूर्ण करण्याबाबत प्रशासकांनी योग्य ती कार्यवाही केली नाही तर कांदळे, कांदळेपाडा व उचेडे ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version