कांडणे शाळेच्या विद्यार्थ्यांनाही आरडीसीसी बँकेचे आकर्षण

क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत भेट
| मुरूड | वार्ताहर |
नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अनुभवातून प्रत्यक्ष अध्यापनास महत्त्व दिले आहे. इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात बचतखात्याचे प्रकार व सरळव्याज या संकल्पना अभ्यासासाठी आहेत. त्याअनुषंगाने रा.जि.प. शाळा कांडणे बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा रायगड येथे प्रत्यक्ष भेट देवून बँकेच्या व्यवहारांची माहिती घेतली.

यावेळी बँकेचे शाखा प्रबंधक रसाळ यांनी खात्यांचे प्रकार,बचतीचे प्रकार तसेच रक्कम जमा करणे व रक्कम काढणे याविषयी अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांनी पैसे काढण्याचा व पैसे भरण्याचा तसेच पावती लिहीण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या क्षेत्रभेटीचे आयोजक हेमकांत गोयजी, यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे रायगड जिल्ह्याच्या विकासात असलेले योगदान अधोरेखित केले. या बॅकेला राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळाल्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जिल्हा बॅक ग्रामीण भागातील नागरीकांना आधार देणारी बॅक असून आपण प्रत्येकानी बचतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे असेही सांगितले. या प्रसंगी शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य करून शालेय विद्यार्थांना बचतीचे धडे दिले.

या उपक्रमासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष यादव यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मीनाक्षी राऊत शिक्षक पांडुरंग हेमाडे यांचेही सहकार्य लाभले.

रायगड जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्यातील नामांकित बॅक असून ग्रामीण भागात दर्जेदार सुविधा देत असून बँकेच्या कामकाज व व्यवहार विद्यार्थी दशेत समजल्यास ते खर्‍या अर्थाने आर्थिक साक्षर होतील. श्री. रसाळ, शाखा प्रबंधक

बँकेचे व्यवहार व आपले दैनंदिन जीवनातील बँकेचे महत्त्व याविषयी समज प्रत्यक्ष अनुभवातून वाढविल्यास पाठ्यपुस्तकातील ज्ञान व दैनंदिन व्यवहार यात सांगड घालता येते. यातूनच विद्यार्थी अनुभव समृद्ध होतील. मीनाक्षी राऊत, उपशिक्षिका

Exit mobile version