| पेण | प्रतिनिधी |
कोकण आपत्ती सौमीकरण योजनेअंर्तगत सुरु करण्यात आलेल्या कणे कोप्रोली खारबंदिस्ती योजनेचे पहिल्याच पावसात तीन तेरा वाजले आहेत. जवळपास 9 कोटी रूपयांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे 9 कोटीच्या योजनेची किंमत शेतकऱ्यांच्या नजरेत 90 रुपयांची उरलेली नाही. महत्वाची बाब म्हणजे युध्दपातळीवर या बंदिस्तीचा विचार केला नाही तर खारबंदिस्ती फुटल्यास कणे खलाटी सोबत कणे गावाला ही पुराचा धोका होण्याची शक्यता नाकारात येणार नाही. तरी निकृष्ट दर्जाचे काम करण्याऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी कणे सरपंचाकडून होत आहे.
कणे-कोप्रोली खारबंदिस्ती योजनचे काम श्री. स्वामी समर्थ इंजिनिअरिंग पुणे मुख्य संचालक तात्या माने हे करत असून, मात्र या कंपनीने भानुशाली नामक सब ठेकेदार नेमला आहे. या ठेकेदाराने खारभुमी खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे खारभुमीच्या योजना उन्हाळयाच्या पाच महिन्यात पूर्ण करणे गरजेचे असते. कारण कोकणामध्ये पडणार पाऊस आणि भौगोलिक स्थिती पाहता या योजना उन्हाळयाच्या कालावधीत पूर्ण केल्या नाहीत तर अपुऱ्या कामाचा निकाल शून्य असतो. खारभुमीच्या योजना या खाडीच्या बाह्यकाठ्याला अनुसरून आखलेल्या असतात. त्यामुळे त्या करताना अनुभव आणि यंत्र सामुग्री याचा ताळमेळ असणारा ठेकेदाराच कामं करु शकतो. श्री. स्वामी समर्थ इंजिनिअरिंग पुणे यांनी शासनाकडून या योजनेचा ठेका घेतला. मात्र, शासनाला कोणतीही सूचना न देता भानुशाली नामक व्यक्तीला हा ठेका दिला आहे. त्याला कोकणातील भौगोलिक स्थितीची काहीही माहिती नाही. या ठेकेदाराला राजकीय वरदहस्त असल्याचे बोलल्याचे जात असून, त्याने मनमानेल तसे काम केले आहे. कायद्यानुसार मुळ ठेकेदाराने सब ठेकेदार नेमताना शासनाला व खारभुमी खात्याला कळविणे गरजेचे असते. परंतु, अशा प्रकारे श्री. स्वामी समर्थ इंजिनिअरिंग पुणे यांनी असे शासनाला कळविले नाही, अशी कबुली पेण तहसील कार्यालयात या योजने संदर्भात झालेल्या बैठकीवेळी खारभुमी विभागाचे उपअभियंता अतुल भोईर यांनी दिली होती. मात्र, याबाबत ना तहसीलदार ना खारभुमी विभागाचे अभियंता यांनी लक्ष दिले.
साधारणतः कोठ्याला (खाडी शेजारील जमिनीलगत ) 40 फुट रुंद, 10 फुट उंच आणि 10 फुट माथ्याची रुंदी, 1 फुटाचे मुरुम दगडी पिचींग अशी खारबंदिस्ती करणे गरजेचे होते. त्यानंतर त्यावर रोलिंगही करणे गरजेचे होते. मात्र, असे झालेले नाही. दोन उघाडी व 10 गडग्यांचे काम करणे गरजेचे होते. परंतु, आज त्या स्थितीत हे काम न झाल्याने पहिल्याच पावसात खारबंदिस्ती खाडीच्या बाजूने वाहून गेली आहे. साधारणतः ही खार बंदिस्ती पाच किलोमीटर अंतराची आहे. यामधील जवळपास एक किलोमीटची बंदिस्ती पूर्णतः खाडीच्या बाजृूने सरकली आहे. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या पावसामध्ये पूर्ण बंदिस्ती खाडीच्या बाजूने सरकून शेकडो एकर कणे खालाटीतील शेत जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. खार भुमी खात्याकडून तात्पुरत्या स्वरूपात 20 ते 25 फुटाच्या अंतरामध्ये लाकडी खांब मारले आहेत. या पलीकडे काहीही केलेले नाही. याविषयी विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनीवरुन उपअभियंता अतुल भोईर व कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना वारंवार संपर्क केला. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.







