चर्चेत राहण्यासाठी अजुन काय काय करणार कंगना?

आता तर तिने देशाचं नाव बदलण्याची केली मागणी; इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सामाजिक असो किंवा राजकीय कंगना नेहमीच कोणत्याही विषयावर बिनधास्त आपलं मत व्यक्त करताना दिसते. कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहत देशाचं इंडिया हे नाव बदलून फक्त भारत हेच नाव देण्याची मागणी केली आहे. कारण तिच्या मते इंडिया हे नाव गुलामीचं प्रतीक आहे. यासोबतचं जोपर्यंत देश पाश्‍चिमात्य देशांची चीप कॉपी म्हणून राहिल तोपर्यंत स्वतःची प्रगती करू शकणार नाही असंही तिनं म्हटलं आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनानं लिहिलं, आपला देश तेव्हाच प्रगती करू शकतो. जेव्हा सर्वजण आपलं प्राचीन आध्यात्म आणि ज्ञान यावर अवलंबून राहतील. हे आपल्या महान सभ्यतेचा आत्मा आहे. जग आपल्याकडे पाहिल आणि आपण त्याचे नेता म्हणून उभे असू.फ कंगनानं तिच्या पोस्टमध्ये वेद, गीता आणि योग यावर भर देत देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत हेच नाव ठेवण्याची मागणी केली आहे.

यासोबतच इंडिया हे नाव गुलामीचं प्रतीक असल्याचं तिनं म्हटलं आहे.कंगनानं तिच्या दुसर्‍या एका पोस्टमध्ये म्हटलंय, इंग्रजांनी आपल्याला गुलामीचं नाव दिलं आहे. ज्याचा अर्थ सिंधु नदीच्या पूर्वीचा भाग असा होतो. तुम्ही कोणत्याही नवजात बाळाला, छोटं नाक, दुसरं बाळ किंवा सी सेक्शन अशी हाक माराल का? मग हे कसं नाव आहे?

मी तुम्हाला भारत या नावाचा अर्थ सांगते, हे नाव तीन संस्कृत शब्द भा (भाव), र (राग) आणि त (ताल)मिळून बनलेलं आहे. इंग्रजांचे गुलाम होण्यासाठी आपण हेच नाव वापरत होतो. या देशातल्या प्रत्येक नावात एक स्पंदन आहे, हे इंग्रजांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या देशातील लोकांचीच नाही तर अनेक ठिकाणांचीही नावं बदलून टाकली. आपण आपला गमावलेला गौरव परत मिळवला पाहिजे. तर मग देशाच्या नावावरूनच याची सुरुवात करुयात.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात थलायवी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात तिनं तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय कंगनाकडे धाकड आणि तेजस असे दोन चित्रपट आहेत.

Exit mobile version