ऑस्ट्रेलियाचा तब्बल 134 धावांनी पराभव
| लखनौ | प्रतिनिधी |
ऑस्ट्रेलियाच्या संघाला आता विश्वकरंडकाच्या दुसऱ्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला तब्बल 134 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची विश्वचषकामधील वाट बिकट दिसत असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ द. आफ्रिकेच्या 312 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा. पण यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे वस्त्रहरण झाल्याचे पाहायला मिळाले. कारण 27 धावांवर ऑस्ट्रेलियाचे मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघेही सलामीवीर बाद झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव जो गडगडला तो पुन्हा उभारी घेऊ शकला नाही.
स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेलसारखे दिग्गज फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसही यावेळी लवकर बाद झाला. मार्नस लाबुशेनने यावेळी 46 धावांची खेळी साकारत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला संघाचा पराभव मात्र टाळता आला नाही. या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. कारण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. पण या पराभवानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ आता गुणतालिकेत चक्क नवव्या स्थानावर गेला आहे. नेदरलँड्ससारखा नवखा संघही त्यांच्या वरच्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा पराभव ऑस्ट्रेलियासाठी एक मोठा धक्का ठरला आहे.