नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या 28 सप्टेंबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होईल, अशी माहिती एएनआयने सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती. कन्हैया कुमारने काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. पण जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अचानक घेतल्याचं यामुळे दिसून आलं आहे. 2019 साली कन्हैया कुमारनं बिहारमधील बेगुसराय मतदार संघातून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती.