कोकणातल्या माणसांना फणसाची उपमा देण्यात येते. फणस वरुन काटेरी असतो पण आतून गरे गोड गोड असतात. अशाच स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात. मिनाक्षीताई पाटील यांना ही फणसाची उपमा अगदी तंतोतंत लागू होते. माझे वडील ज्येष्ठ पत्रकार, आहुतिचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसैनिक वसंतराव त्रिवेदी हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत सक्रीय होते, तेंव्हा पासूनच मिनाक्षीताई यांच्या संपर्कात आलो. त्याही झुंझार पत्रकार या नात्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत कार्यरत होत्या. मिनाक्षीताई पाटील यांना सामाजिक कार्याचे आणि पत्रकारितेचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. प्रभाकर पाटील हे तडाखेबंद व्यक्तिमत्त्व म्हणजे मिनाक्षीताई यांचे वडील. भाई जयंत पाटील हेही मिनाक्षीताई यांचे बंधुराज. तेही जबरदस्त धारदार व्यक्तिमत्त्व. कृषिवल साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर झाले. शेतकरी कामगार पक्षाचे जणू कृषिवल हे मुखपत्रच बनले. प्रभाकर पाटील यांनी सुरु केलेले कृषिवल पुढे जयंतराव आणि मिनाक्षीताई आणि मग ते पुढच्या पिढीकडे वारसाहक्काने चालत आले. पाटलांची तिसरी पिढी कृषिवल अगदी जोमाने चालवीत आहे. या कृषिवल मधूनच कविबंधू जगदीश यांची ओळख होऊन मैत्रीत रुपांतर झाले. साप्ताहिक असतांना कृषिवल नियमितपणे अंबरनाथ येथे आमच्या घरी टपालाने येत असे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रायगड जिल्ह्यातील पाटील परिवाराने शेतकरी कामगार पक्षाचे खटारा हे चिन्ह सांभाळून पुढे नेले. यशवंतराव चव्हाण यांनी 1957 साली यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेस मध्ये आणले असले तरी भाई उद्धवराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळप, विठ्ठलराव हांडे, दि. बा. पाटील, दत्ता पाटील यांच्यापासून तर मोहन पाटील, विवेक पाटील, धैर्यशील पाटील आदींनी शेतकरी कामगार पक्ष जोमाने वाढविला. पण काळाच्या ओघात हा पक्ष कमकुवत झाला. तरीही रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे काम मिनाक्षीताई आणि भाई जयंत पाटील हे प्रामाणिकपणे करीत आहेत. 1977 साली भारतीय जनसंघ, समाजवादी, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल या चार पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आला. 1978 साली शरद पवारांनी जनता पक्षा बरोबर पुरोगामी लोकशाही दल बनवून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या सरकारात शेतकरी कामगार पक्ष सहभागी झाला. नंतरच्या सरकार मध्ये शेतकरी कामगार पक्ष सहभागी होतांना त्यात मिनाक्षीताई पाटील यांना राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे 1995 पासून 2014 पर्यंत तीन वेळा मिनाक्षीताई पाटील यांनी यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच वर्षी मिनाक्षीताई पाटील यांचा जन्म झाला. भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याच प्रमाणे ’अमृततुल्य’ अशा मिनाक्षीताई पाटील यांचाही अमृत महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करतांना मिनाक्षीताई यांनी त्या त्या पदाचा समाजासाठी उपयोग केला. विरोधी पक्षात असतांना सत्ताधार्यांना त्या धारेवर धरल्याशिवाय रहात नव्हत्या तसेच सत्तेत असतांना ती त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. कोणत्याही पदाचा कधीही गाजावाजा केला नाही की बडेजावपणा दाखविला नाही. जाहीर सभा असो की विधानसभा. या ठिकाणी त्या रणरागिणीच्या रुपात अक्षरशः विरोधकांवर तुटून पडत. आपल्या घणाघाती भाषणाने त्या समोरच्याला ’दे माय धरणी ठाय’ करायला लावीत. करारी स्वभावाच्या मिनाक्षीताई अत्यंत कनवाळू स्वभावाच्या होत्या. अन्यायाविरुद्ध आग ओकणार्या मिनाक्षीताई पाटील अन्यायग्रस्तांसाठी कनवाळू होतांना दिसून येत. एखादी गोष्ट चांगली वाटली की त्याची स्तुती त्या मुक्तकंठाने करतात. एकदा राज्यमंत्री असतांना मिनाक्षीताई कार्यक्रमाच्या निमित्ताने बोरीवली येथे आल्या होत्या. मी अंबरनाथ येथून बोरीवली येथे स्थायिक झालो होतो. मिनाक्षीताई पाटील यांचे स्वीय सहायक अविनाश पाटील सोबत होते. लाल दिव्याची गाडी मला दिसली. म्हटलं कोण आहे ? पाहतो तो मिनाक्षीताई पाटील. अविनाश पाटील यांच्या बरोबर संपर्क साधला. मिनाक्षीताईंना म्हणालो, ताई, भावाचं घर जवळच आहे. मिनाक्षीताई यांनी लगेच गाडी फिरवली आणि त्या माझ्या घरी आल्या. मनसोक्त गप्पा मारल्या. माझ्या आई वडिलांपासूनचे आमचे मिनाक्षीताई पाटील यांच्या बरोबर कौटुंबिक संबंध असल्याने त्या हक्काने माझ्या घरी आल्या. माझी पत्नी माया हिने त्यांच्यासाठी कोथिंबीर वडी बनविली होती. त्यांनी ती चवीने खाल्ली. मग विधानभवनात भेटल्या की अरे, वहिनीला सांग ती कोथिंबीर वडी चांगली होती, पुन्हा बनवून पाठव, असे आवर्जून सांगत. प्रेमादराने पाठीवर धपाटा घालायलाही त्या कमी करीत नव्हत्या. चांगल्या गोष्टीला दाद देण्याचा स्वभाव मिनाक्षीताई पाटील यांच्यासाठी उपयुक्त ठरला. मिनाक्षीताई पाटील या झुंझार रणरागिणीला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन !
-योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321