कामांची चौकशी करण्याची मागणी
उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील मच्छिमार बांधवांसाठी करंजा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. सदर जेट्टीचे काम कधी पूर्ण होऊन व्यवसायाला सुरुवात होते याकडे करंजा मच्छिमार बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच येथील कामांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे. या परिसरातील मच्छिमार बांधवांना मासेमारी बोटी लावण्यासाठी जेट्टी नसल्याने मुबंई येथील जेट्टीवर जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मच्छिमार जेट्टीला परवानगी देऊन थाटामटात उद्घाटन करीत कामालाही सुरुवात झाली. सदर जेट्टीच्या उभारणीसाठी 150 कोटी मंजूर करण्यात आल्याचे समजते. परंतु त्यात आता वाढ होऊन हा ठेका 200 कोटींच्यावर गेल्याचे समजते. तरीही काम पूर्ण झाले नाही.
सदर जेट्टीच्या कामांचा ठेका मिळाले ठेकेदार पवार यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे. सदर कामाला नियमानुसार दिलेली मुदत होती. परंतु या मुदतीत काम काही पूर्णत्वाला गेलेले दिसत नाही. याबाबत काय नियमावली आहे हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. तसेच सदर कामाचा पहिला टप्पा हा ठेकेदारांने हा अत्यंत चलाखीने लवकर केल्याचे दिसते. त्यासाठी रात्रीही काम केल्याने मटेरियल हे कोणत्या दर्जाचे वापरले याची माहिती कोणा वरिष्ठ अधिकार्यांनाही नाही. त्यामुळे सदरच्या कामांबद्दल संशय निर्माण होत आहे. या कामांची सखोल चौकशी होणे आवश्यक बनले आहे. सदर जेट्टीच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने बोटी आताच लागत नाहीतर भविष्यात बोटी या गाळात रुतणार तर नाही ना? अशी चर्चा मच्छिमार आतापासूनच करीत आहेत. जेट्टी उभारल्यानंतर या ठिकाणावरून वाहनांची ये जा करण्यासाठी मोठ्या रस्त्याची गरज असतानाही तो अद्याप पर्यंत मार्गी लागत नाही. तसेच रो-रो सेवा करंजा – रेवस पुलही सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ही रस्त्याचे नियोजन नाही. मग हे प्रकल्प सुरू करण्यामागचा शासनाचा नक्की धोरण काय आहे. तरी मच्छिमार जेट्टी सुरू करण्याआधी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे बनले आहे.
जेट्टीसाठी गेले दोन पावसाळ्यात भराव करण्यात आलेली माती वाहून गेली आहे. तसेच मातीऐवजी चिखल, दगड यांचा भराव ठेकेदारांनी करून शासनाची एकप्रकारे फसवणूक केली आहे. याची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना माहिती असूनही ते याकडे डोळेझाक करीत असल्याने त्यांचे ठेकेदारांशी हातमिळवणी असल्याची चर्चा मच्छिमार बांधवांत सुरू आहे. राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे व खार जमिन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जानेवारीत मच्छिमार जेट्टीची पहाणी करून कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली होती. त्यावेळी ठेकेदारांने कामांची हमी देऊन एप्रिल 2021 पर्यंत पहिला टप्पा सुरू करून जानेवारी 2022 ला जेट्टीचे काम पूर्ण होण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मंत्रीमहोदयांना दिलेल्या मुदतीत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले नाही. याबाबत सदर ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली याची माहिती देण्यास मत्स्यव्यवसायचे वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामध्ये नक्कीच गौडगंबाल असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिलेल्या मुदतीत ठेकेदाराकडून जेट्टीचे काम पूर्ण झाले नसतानाही जेट्टीची उंची वाढविण्याची मागणी मच्छिमार बांधवांकडून केली जात आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाऊन आधी जेट्टीचे दिलेले काम पूर्ण होऊ दे मग उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करू हे काय लगेच होणारे काम नाही. त्यासाठी पुन्हा एकदा मंजुरी घेऊन खर्चाची तरदूत करावी लागेल. तरी हा सर्व ठेका आधी किती कोटीचा होता नंतर किती कोटींनी वाढविला, मुदत किती होती तसेच कामाचा दर्जा याचबरोबर संबंधित मत्स्यव्यवसायचे शासकीय अधिकारी वर्ग यांची सखोल चौकशी केली तर नक्कीच यामागचे गौडगंबाल उघड होईल अशी चर्चा मच्छिमार बांधवात सुरू आहे.