कारगील मॅरेथॉन 31 ऑक्टोबरला

रन फॉर युनिटीचा संदेश देणार
। पुणे । वृत्तसंस्था ।
कारगिल मॅरेथॉन या वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी अर्थातच 31 ऑक्टोबरला आयोजित करण्यात येणार आहे. सरहद पुणे, लडाख पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल कारगिल व जिल्हा प्रशासन कारगिल यांच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कारगिल मॅरेथॉनचे मुख्य संयोजक संजीव शहा यांनी दिली. राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून कारगिल येथे आयोजित करण्यात येणार्‍या या मॅरेथॉनमध्ये रन फॉर युनिटीचा संदेश देण्यात येणार आहे.
यंदा या मॅरेथॉनमध्ये 5 किमी, 10 किमी, 21 किमी, 42 किमी आणि टायगर हिल चॅलेंज 160 किमी या गटांमध्ये स्पर्धक सर्वस्व पणाला लावतील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू यामध्ये सहभागी होणार नाहीत. तरीही 300 धावपटूंचा यामध्ये सहभाग असणार आहे.
थीम साँगचे लोकार्पण
डॉ. प्रभाकिरण जैन यांनी या मॅरेथॉनचे थीम साँग लिहिले असून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी ते गायले आहे. मजहर सिद्दिकी यांनी ते संगीतबद्ध केले आहे. लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या हस्ते या थीम साँगचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त पृष्णप्रकाश यांची मॅरेथॉन दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version