कर्‍हाड-पाटण नेते मुंबईत तळ ठोकून


| सातारा | वृत्तसंस्था |

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यावरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर होतील, अशी चिन्हे आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील कर्‍हाड-पाटण तालुक्यातील नेते कालपासूनच मुंबईत तळ ठोकून आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील दिग्गजांची फळी असूनही पक्षात फूट पडल्यामुळे उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीला उभे राहण्यास नकार दिला. त्यामुळे पहिल्यांदाच सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्यासाठी खा. शरद पवार यांना सातार्‍यात यावे लागले.

त्यांनी पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे पुढे आली. मात्र, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची उमेदवारी कोणाला द्यायची? हे अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा झाली होती. यामध्ये पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सातारा लोकसभा तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला.

हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांनी नाकारला; पण ते काँग्रेसच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आता इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरू केली आहे, तर खासदार श्रीनिवास पाटील यांनाच यावेळेसही उमेदवारी द्यावी, अशी मागणीही पदाधिकार्‍यांनी केली आहे. त्यावरून मार्ग काढण्यासाठी खासदार पवारांनीही वेळ घेतला आहे. महाविकास आघाडीच्या या सर्व घडामोडींसाठी कर्‍हाड-पाटण तालुक्यातील नेते कालपासून मुंबईत तळ ठोकून आहेत.

Exit mobile version