। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील गारपोली येथे २६एप्रिल च्या रात्री दुकानातील सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात दुकानाचे १००टक्के नुकसान झाले आहे. कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर गारपोली गावाशेजारी जीवन शिंदे हा तरुण अल्पोपहार आणि चहाचे दुकान चालवतात.शिंदे हे सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत आपले रस्त्याच्या कडेला असलेले दुकान चालवतात.त्या दुकानात नाश्टा तयार करण्यासाठी असलेली शेगडी आणि सिलेंडर सह तेल असे ज्वलनशील साहित्य असते. रात्री दुकान बंद करताना शिंदे यांनी देवघरात लावलेला दिवा नेहमीप्रमाणे तेवत ठेवला होता. रात्री साडे दहाच्या सुमारास त्या दुकानातील गॅस सिलेंडर चा स्फोट झाला आणि त्यात मोठा आवाज होऊन दुकानात आग लागली. बाजूलाच प्रतीक्षा लॉन मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता आणि त्यामुळे आगीचा भडका उडताच अवघ्या दोन मिनिटात शेकडो लोक तेथे पोहचले. पण आगीचा भडका पाहून आग विझवणे शक्य नव्हते. काही मिनिटात गॅस सिलेंडर स्फोट नंतर आगीमध्ये दुकान जळून खाक झाले आणि त्यात ४०-४५ हजाराचे नुकसान जीवन शिंदे यांचे झाले आहे.