कर्जत-कशेळे-मुरबाड रस्त्याचे काम कुर्मगतीने

सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांचा सवाल
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत कशेळे मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले चार वर्ष कासवगतीने सुरू आहे. कोणत्याही नियोजन नसल्याने काम संथगतीने सुरू आहे, हा रस्ता कधी पूर्ण होणार,असा सवाल सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले चार वर्ष कासवगतीने सुरू आहे.कोणत्याही प्रकारचे नियोजन आणि नक्की काय करायचे याची माहिती ना ठेकेदाराला आहे ना अधिकार्‍यांना. रस्त्याचे 90% काँक्रीटीकरण रात्रीच्या अंधारात झाले, शास्त्रीय कारण ठेकेदाराव्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही. गेल्या चार वर्षात या कामाच्या देखरेखीसाठी कोण कर्मचारी आहेत त्यांनाही आजतागायत कोणी पाहिले नाहीत. असे उदय पाटील यांनी निदर्शनास आणले आहे.

ज्या ठिकाणी काम करायचे तेवढा रस्ता खणून काम करणे योग्य झाले असते.परंतु चांगल्या अवस्थेतील संपूर्ण रस्ता सुरुवातीलाच खणून ठेवला. चार वर्ष उलटून देखील नालधे, कशेळे, पेजनदी, वंजारवाडी, टाकवे परिसरातील रस्ता तसाच आहे. कशेळे, कडाव गावातील डांबरीकरण एकाच पावसाळ्यात उखडून त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. याची दखल ठेकेदार किंवा अधिकारी घेत नाहीत.याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पेजनदी पुलाची अक्षरशः चाळण झाली आहे. तीस चाळीस टनाची अवजड वाहने पुलावरील खड्ड्यात सातत्याने आपटत असताना स्लॅबला जोरात धक्के बसून पूर्ण पूल हादरतो हे खड्डे वेळेवर भरले नाहीत तर पुलाचा स्लॅब कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असणार हा प्रश्‍न आहे. असा प्रश्‍न पाटील यांनी उपस्थित केला आहे, मागील वर्षाच्या मे महिन्या पासून या रस्त्याचे काम एक इंचही पुढे सरकले नाही. कदाचित झाले तितके काम हा विचार करून कार्यकारी अभियंत्यांनी त्याचे बील देऊन करारनामा केला का?अशी चर्चा लोकांमध्ये ऐकावयास मिळत आहे.

सदर रस्ता एमएसआरडीसी अंतर्गत असून माननीय मुख्यमंत्री हे या खात्याचे अध्यक्ष आहेत. कर्जत मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असून ते या रस्त्याने रोजच् प्रवास करतात. असे असताना या रस्त्याचे काम का लागत नाही असा प्रश्‍न या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे, कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांनी नक्की काय वस्तुस्थिती आहे हे स्पष्ट करावे असा प्रश्‍न उपस्थित करून उदय पाटील यांनी पंधरा दिवसात उर्वरित भागात काँक्रीटीकरण जमत नसेल तर किमान डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी केली आहे.

Exit mobile version