कर्जत- मुरबाड महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळ करीत आहे. या रस्त्यावर आरसीसी काँक्रीटीकरण करताना राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून अनेक ठिकाणी 10 मीटर लांबीचे भाग बनविण्यात आले नाहीत, परिणामी त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवास करणारे वाहनचालक हे जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. दरम्यान, या राष्ट्रीय महामार्गावर अर्धवट कामे तेहवली असताना देखील त्याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाला कोणतेही देणेघेणे नसल्याचे दिसून येत असून त्या त्या ठिकाणी रस्ता बंद आहे असे फलक लावण्याचे सौजन्य देखील रस्ते विकास महामंडळ दाखवताना दिसत नाही. कर्जत तालुक्यातून जाणार्‍या कर्जत- मुरबाड रस्त्याचे 53 किलोमीटर लांबीचा रस्ता कर्जत तालुक्यातून जातो. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 548अ चा भाग असून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून केले जात आहे. मात्र रस्त्यावर काँक्रीटीकरण हे एकसंघ केले नाही आणि त्यांचा फटका रस्त्याने वाहतूक करणार्‍या वाहनचालक यांना बसत आहे.


कारण रस्त्यात काँक्रीटीकरण अखंडपणे न करता मध्येच 10 मीटर चा भाग याठिकाणी बांधकाम केले नाही. त्यात त्याबाबत माहिती देणारे फलक देखील राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून लावून घेण्यात आले नाहीत. रस्त्यावर अचानक येणारे खड्डे यामुळे वाहनांचे दररोज अपघात होत आहेत. हे दहा मीटर लांबीचे रस्ते वाहनचालक यांच्यासाठी मृत्यूचे सापळे समजले जात आहेत. रस्त्यावरील त्या खड्ड्यांच्या ठिकाणी रस्ते सलग करावेत आणि संबंधित सर्व खड्डे असलेल्या ठिकाणी वाहनचालकांना सूचित करणारे रेडियम मधील फलक लावावे. – प्रभाकर गंगावणे,माहिती अधिकारी कार्यकर्ते

Exit mobile version