कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मोटारसायकल चोरास ठोकला बेड्या
कर्जत, खालापूर पोलीस ठाण्यात 7 गुन्हे उघडकीस
कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळ कर्जत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी मध्ये मोटारसायकल चोरी करणार्‍या दोन अट्टल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, कर्जत आणि खालापूर पोलीस ठाण्यात हद्दीत 7 मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले आहे.
जिल्हा पोलिस दलाकडून ऑलआउट ऑपरेशन जाहीर केले होते. त्याप्रमाणे कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाणे हद्दीत श्रीरामपूर व चार फाटा येथे नाकाबंदी नेमून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्यावेळी श्रीरामपूर ते येथे नाकाबंदी करण्याकरिता नेमलेले पोलीस हवलदार जयवंत काठे, पोलीस शिपाई गणेश बोराडे, महिला पोलीस शिपाई मनाली शिंदे, पोलीस शिपाई अनुजित शिंदे येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तपासणी करीत असताना मुरबाड बाजूकडून येणारी संशयित पल्सर मोटरसायकल त्यांनी अडवली सदर मोटरसायकलचा नंबर प्लेट ची पोलीस हवलदार काठे यांनी पाहणी केली असता ती (एम एच 46 -वाय -52 27) असल्याने सदरची मोटरसायकल ही त्यांच्याकडील तपासावर असलेल्या कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/2021 भादवि कलम 379 मधील चोरीस गेलेली मोटरसायकल असल्याची पोलीस हवलदार जयवंत काठे यांची खात्री पटली.त्यावेळी इतर पोलिसांच्या मदतीने सदर मोटारसायकल वरील दोन स्वार इसमांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचे नाव गाव विचारले असता 1) अनिकेत नंदकुमार जाधव (वय-22) राहणार बौद्धवाडा कोषाणे तालुका कर्जत जिल्हा रायगड, 2) आकाश गोविंद मोरे (23 -वर्ष ) राहणार भीमनगर परळी तालुका सुधागड जिल्हा रायगड असे सांगितले.
त्या वेळी त्या दोघा इसमांना पोलीस ठाणे येथे आणून पोलिसांनी त्यांच्याकडे मिळून आलेली मोटरसायकल बाबत विचारपूस केली त्यावेळी ते दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली त्यावेळी सदर इसमास विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही भिसेगाव खिंडी जवळील पेट्रोल पंपाजवळ चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे मधील पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, पोलीस हवलदार जयवंत काठे, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार हर्षद जमदाडे, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई अश्रुबा बेंद्रे, पोलीस शिपाई मंदार माळवी यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता कर्जत पोलीस ठाणे हद्दीत 6 तर खालापूर पोलिस ठाणे हद्दीत 1 अशा एकूण 7 मोटरसायकली चोरी केल्याचे तपासात कबूल केले. आरोपींनी चोरलेल्या 7 मोटारसायकली जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

Exit mobile version