| कर्जत । वार्ताहर ।
स्वच्छ सर्वेक्षण 2021-22 मध्ये कर्जत नगर परिषदेने चमकदार कामगिरी केली असून स्वच्छता अभियानामध्ये देशात पाचवा क्रमांक तर महाराष्ट्रातील पश्चिम विभागात पहिला क्रमांक मिळाला आहे. तसेच 25 ते 50 हजार लोकसंख्या मध्ये पश्चिम विभागात पहिला क्रमांक मिळाला आहे.
1 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील ताल गटोरा स्टेडियम येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थित केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार घेण्यासाठी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, अशोक ओसवाल, मुख्याधिकारी वैभव गारवे, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, राहुल डाळींबकर, सुदाम म्हसे, सुनिल लाड उपस्थित होते.
कचरा संकलन, वाहतूक व्यवस्था,ओला- सुका कचरा वर्गीकरण व त्याची विल्हेवाट लावणे, घनकचरा प्रकल्प, रस्ते सफाई, गटारे, शहरातील प्लॉस्टिक बंदी, सेफ्टी टँकमधील मैल्यावर प्रक्रिया, बांधकाम राडा रोडा त्याच्यावर प्रक्रियाकरून पेव्हर ब्लॉक बनविणे या नगरपरिषदेच्या कामावर निरीक्षण करून केंद्र शासनाने याची दखल घेतली होती. 2016 पासून सलग पाच वर्ष सर्वेक्षण अभियान स्पर्धेत भाग घेत आहे. 2021व 2022 सलग दोन वर्ष नगरपरिषदेने स्पर्धेत चमक दाखवली आहे.