कर्जत एसटी आगाराला नवी झळाळी

22 एसटी गाड्या बनल्या नवीन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत एसटी आगाराच्या माध्यमातून कर्जत आणि खालापूर तालुक्यात एसटी गाड्या चालविल्या जातात. मात्र, जुन्या गाड्यांमुळे प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आगारातील 22 एसटी गाड्यांना नवीन झळाळी देण्यात आली असून आणखी 15 गाड्या नवीन रूप धारण करण्याचा तयारीत आहेत. दरम्यान, कर्जत आगारात आता बहुसंख्य गाड्या या नैसर्गिक इंधनावर चालविल्या जाऊ लागल्याने पैशाचीदेखील बचत होऊ लागली आहे.

कर्जत आगारातून सर्व भागात गाड्यांचे नियोजन येथील स्थानकातून केले जाते. आगारात सध्या 38 गाड्या असून त्यातील एक गाडी वगळता अन्य सर्व 37 गाड्या कार्यरत आहेत. शासनाने सर्व आगारामध्ये महानगर गॅस निगमकडून सिएनजी गॅस पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कर्जत येथे महानगर गॅस निगमकडून पंप सुरू झाला आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांचे डिझेल गाडीमधून सीएनजी इंधनमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा कर्जत आगारातील 22 गाड्यांना झाला असून त्या गाड्या नव्या रुपात सज्ज होऊन आगारात आल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत या गाड्या नवीन रूप धारण करून आल्या आहेत. त्यात जुन्या लालपरी गाडीची चेसी वगळता अन्य सर्व बदल करण्यात आले आहेत. कर्जत आगारात रुजू झालेल्या गाड्यांमध्ये असलेले सीटवर लावलेले प्लास्टिक कव्हरदेखील अद्याप तसेच आहेत. अशाप्रकारे अगदी नव्या कोर्‍या गाड्या आगारात रुजू झाल्या आहेत. एकूण 37 गाड्या या टप्प्या टप्प्याने आगारात दाखल होणार असून सहा गाड्या या नवीन गाड्यांसारखे बदल करून कार्यरत झाल्या आहेत. या नवीन गाड्यांमध्ये प्रवासी देखील आनंद व्यक्त करू लागले आहेत. या गाडयामध्ये प्रवाशी वर्गाला सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक तसेच मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी व्यवस्था आहे. तसेच नवीन लूक देण्यात आल्याने प्रवासी देखील समाधानी आहेत. गाड्या नैसर्गिक इंधनावर चालविल्या जाऊ लागल्याने आर्थिक दृष्ट्या फायद्याची ठरत आहे. आगारामध्ये इंधन पंप सुरू झाल्याने वेळ देखील वाचत आहे.

एक लिटर डिझेलमध्ये चार किलोमीटर गाडी चालत होती. एक किलो सीएनजी 72-75 रुपये दराने मिळत असल्याने एसटीची आर्थिक बाजू सावरण्यास मदत होत आहे.

मानसी शेळके,
आगार प्रमुख
Exit mobile version