कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी सज्ज

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा उपलब्ध होत्या. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असले तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाने खबरदारीचा उपाय म्हणून आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मागील वर्षात कोरोनावर मात करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोव्हिड रुग्णांसाठी 50 खाटा तयार ठेवण्यात आल्या होत्या. त्यात डिसेंबर 2020 मध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयात केंद्र शासनाच्या पीएम केअर फंडातून आणि स्थानिक आमदार यांच्या निधीमधून व्हेंटिलेटर उपलब्ध झाले होते. त्यातून आयसीयू व्हेंटिलेटरसह परिपूर्ण असलेला 10 बेडचा विशेष वॉर्ड तयार करण्यात आला होता. त्यात तिसरी लाट ही लहान मुलांना बाधा पोहचविणारी आहे, असा इशारा आरोग्य यंत्रणेने दिला आहे. आता कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र थोरवे यांच्या निधीमधून कोव्हिड रुग्णांसाठी सर्व सोयीसुविधा यांनी परिपूर्ण असा कोव्हिड वॉर्ड तयार होत आहे. त्या नवीन वॉर्डमध्ये 30 बेड आणि सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा दिली गेली आहे. त्या वॉर्डचे लोकार्पण अद्याप झाले नाही; परंतु कोव्हिडची तिसरी लाट आल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पूर्ण क्षमतेने तयार आहे. नवीन वॉर्डचे लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज बनसोडे यांनी यावेळी दिली.

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड
शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 10 बेडचा विशेष वॉर्ड कोव्हिडमध्ये लहान मुलांवर उपचार करण्यासाठी सिद्ध केला. त्या वॉर्डमध्ये मिनी व्हेंटिलेटर आणि लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून देण्यात आली होती.

सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम कार्यान्वित
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी परिसरातील रिसॉर्ट मालकांच्या माध्यमातून कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता वॉर्ड, कोव्हिड वॉर्ड आणि लहान मुलांसाठी बनविण्यात आलेले वॉर्ड यांना कोणताही खंड न पडता ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम कार्यान्वित करून घेतली आहे. 2020 मध्ये अशी सुविधा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नव्हती, त्यावेळी ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना सिलिंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता.

Exit mobile version