ऐन हंगामात पाऊस गायब; भाताने भरलेली पिके धोक्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात 15 सप्टेंबर पासून गायब झालेला पाऊस यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस गायब झाल्याने तालुक्यात भाताची पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, शेतामध्ये पाणी शिल्लक राहिले नाही आणि भाताचे कोंबी अद्याप बाहेर पडले नसल्याने भाताचे संपूर्ण पिक धोक्यात आले असून, दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
कर्जत तालुका भाताची शेतीसाठी ओळखला जात होता. मात्र, फार्म हाऊस आणि सेकंड होम यासाठी जमिनी विकल्या गेल्या आणि त्यामुळे भाताचे कोठार ही बिरुदावली कर्जत तालुक्याने गमावली आहे. पूर्वी भाताचे क्षेत्र हे साधारण 25 ते 27 हजार हेक्टर एवढे हे होते ते क्षेत्र आता दहा हजारांच्या खाली आले आहे. तर यावर्षी सुरुवातीला जून महिन्यात पाऊस झाला नाही आणि सध्या जेमतेम सहा हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली आहे. जूनअखेरीस सुरू झालेला पाऊस आणि त्यानंतर चांगला पाऊस सप्टेंबर महिन्याचे पंधरवडापर्यंत सुरू होता. त्यामुळे तीन हजारांहून अधिक मिली पावसाची नोंद होऊनदेखील कर्जत तालुक्यात भाताचे पीक तयार झालेले नाही. साधारण जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत भाताची लावणी पूर्ण होते. परंतु, यावर्षी भाताची लावणी ही ऑगस्ट महिन्यात सुरू होती. त्यामुळे आपोआप भाताचे पीक तयार होण्यात उशीर झाला आहे. दरवर्षी सप्टेंबर अखेरीस भाताचे पीक शेतात पिवळे सोने सारखे तयार होते. परंतु, यावर्षी ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांचे शेतात भाताचे पीक तयार झालेले नाही. शेतीसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत चांगल्या पावसाची आवश्यकता होती, परंतु 15 सप्टेंबरनंतर पाऊसच झाला नाही आणि त्यामुळे भाताची शेती उभारी घेण्याची शक्यता कमी आहे.
परिणामी, भाताचे पीक धोक्यात आले असून, पीक हातात येण्याची शक्यता कमी आहे. आजच्या तारखेला शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाताच्या पिकाला अद्याप कोंब फुटले नाहीत, त्यामुळे भाताचे पीक पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस गायब झाल्याने शेती धोक्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची स्थिती बेताची राहील असे वाटू लागल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे दुष्काळाची मागणी करण्यात सुरुवात केली आहे. तालुक्यातील 25 टक्के शेतकऱ्यांची विविध विकास कार्यकारी सोसायटी असलेल्या नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी सभासद यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदार यांची भेट घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. भाताची शेती सध्या हिरवीगार असून, ती शेती धोक्यात आली असून, शेती बहरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट कर्जत तालुक्यावर दिसून येत आहे.
