वादळी वाऱ्याने शेकडो विजेचे खांब कोसळले
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याला चार दिवस वादळी वाऱ्याने झोडपले आहे. त्यात 13 आणि 14 मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे तसेच झाडांचे नुकसान केले आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यात तालुक्याच्या बहुसंख्य भागात विजेचे खांब कोसळले असल्याने तब्बल दीड दिवस कर्जत तालुका अंधारात होता.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 11 मे पासून अवकाळी पाऊस झाला आहे. त्या अवकाळी पावसाआधी 12 मे रोजी कशेळे, खांडस भागात तर 13 मे रोजी कर्जत तालुक्यात पाषाने-कळंब, देवपाडा, नेरळ परिसरात वादळ आले होते. तर 14 मे रोजी कर्जत तालुक्यातील माणगाव, वाकस, कशेळे, कडाव, खांडस परिसरात वादळी वाऱ्याने झाडे कोसळले. तसेच, घरांचे नुकसान आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात घरांचे नुकसान मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान महावितरण विभागाचे झाले आहे.
महावितरणचे विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता आणि कोसळलेले विजेचे खांब पुन्हा उभे करण्यासाठी 14 मे रोजी सकाळी नऊ पासून शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र, संध्याकाळी चार पासून पुन्हा वादळी वाऱ्याने अवकाळी पावसासह हजेरी लावली आणि वीज पुरवठा खंडित झाला. तो पुर्ववत होण्यास सकाळ झाली. कर्जत आणि कडाव परिसर वगळता रात्री संपूर्ण कर्जत तालुका अंधारात होता. माथेरान देखील अंधारात होते. सकाळी दीड तासासाठी वीज पुरवठा सुरू झाला आणि पुन्हा उर्वरित कामे करण्यासाठी महावितरणकडून वीज खंडित करण्यात आली.
महावितरण रात्रभर ऑन ड्युटी या काळात उकाड्यामुळे कर्जत तालुका हैराण होता. मात्र वादळी वाऱ्याने विजेचे खांब कोसळल्याने सर्व भागात रात्रीच्या वेळी देखील स्थानिक लोकांकडून नवीन विजेचे खांब उभे करण्यासाठी महावितरण ला सहकार्य केले जात होते. या वादळात कर्जत तालुक्यातील मुख्य वीज वाहिनींचे 56 विजेचे खांब हे झाडे उन्मळून आणि जमिन खचल्याने कोसळले आहेत. ते उभे करण्यात येत आहेत. त्याचवेळी गावातील अंतर्गत वीज पुरवठा करणारे तब्बल 70 खांबही कोसळलेले असल्याने बदलावे लागले आहेत. त्यासाठी काही भागात रात्री अडीच तीन पर्यंत तर काही भागात पहाटे पाच पर्यंत महावितरणचे अभियंते, वीज कर्मचारी आणि महावितरणचे ठेकेदारांकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
वादळी वाऱ्याने कोसळलेले विजेचे खांब पुन्हा उभे करून वीज पुरवठा सकाळी काही तास सुरू करण्यात आला होता. कर्जत शहर आणि कडावमध्ये वीज पुरवठा रात्री देखील सुरू होता. सकाळी पुन्हा वीज खंडित करून उर्वरित कामे पूर्ण करण्यावर आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी कामे मार्गी लावत आहेत.
गणेश देवके, उपअभियंता, कर्जत







