कर्जत तालुक्याला महापुराचा विळखा

उल्हासनदी वरील पाषाने पुल पाण्याखाली
। नेरळ । वार्ताहर ।
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे उल्हास नदीवरील कर्जत शहराच्या हद्दीत असलेला बंधाऱ्याला पुराचे पाणी लागले आहे तसेच पाषाने पुलाला पाणी लागले आहे. दरम्यान, पावसाच्या या स्थितीमुळे तालुक्यातील नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी लागलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यांत सरासरी ४१ टक्के पाऊस झाला असून माथेरान मध्ये पाण्याची सरकारी दुप्पट आहे. तर हवामान खात्याने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल्याप्रमाणे रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. त्यात कर्जत तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका हा पुणे जिल्ह्यात पाऊस जोरदार सुरू असेल त्यावेळी बसत असतो. त्यामुळे लोणावळा खंडाळा घाटात पडणारे पाणी उल्हास नदीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात येत असते आणि त्यानंतर कर्जत तालुका जलमय होत असतो. तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी उल्हास नदी आज सकाळ पासून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.


या नदीवरील कर्जत शहरातील आमराई येथील पायपुल वजा बंधारा याला पाणी टेकले असून ४४ मीटर उंचीच्या बंधर्यावरून दुपारी पाणी वाहू लागले आहे. तर त्याचा फटका कर्जत शहरातील बामचां मळा आणि नाना मास्तर नगर भागातील सखल भागात पाणी जागोजागी शिरत असल्याने सर्वांना २०२१ ला मध्यरात्री आलेल्या महापुराची धास्ती लागून राहिले आहे नाना मास्तर नगर मधील मुख्य रस्ता जलमय झाला असून ओढ्याचे पाणी त्या भागात शिरले असून शहरातील इंदिरानगर भागात देखील पाण्याचा वाढता प्रवाह धोका ठरू शकतो. तर उल्हास नदीच्या कडेला असलेल्या बामचा मळा येथील घरांच्या पायऱ्यांना महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.


उल्हास नदीच्या तीरावर कर्जत तालुक्यातील माळवाडी, बेंडसे, वावे, बार्डी, कोल्हारे, धामोते, हंबरपाडा, बिरदोले, शेलू या गावांना मोठा फटका बसत असतो. त्यामुळे त्या त्या ठिकाणी काय स्थिती आहे याची माहिती पोलीस आणि तालुका प्रशासन घेत आहे. प्रांत अधिकारी अजित नैराले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडून पाहणी केली जात आहे.

Exit mobile version