योग्य उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात वाढत्या वीज खंडित समस्येमुळे नागरिकांचा संयमाचा बांध तुटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने 29 एप्रिल रोजी महावितरण कार्यालयात अचानक धडक देण्यात आली. या धडक कारवाईने महावितरण प्रशासनाची धांदल उडाली असून, समितीने तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहर व परिसरात दिवसाढवळ्या व रात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शहरी भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे. याआधी ऑगस्ट 2024 मध्ये कर्जत शहर बचाव समितीने साखळी उपोषण करून महावितरणच्या कार्यप्रणालीचा निषेध केला होता. त्या वेळी महावितरणच्या उपअभियंत्यांनी लेखी आश्वासन देत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे शब्द दिले होते. मात्र, एप्रिल 2025 पासून पुन्हा विजेची समस्या वाढली असून, दिलेली आश्वासने हवेत विरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यामुळे पुन्हा कर्जत तालुका वीज संघर्ष समिती यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली. शिष्टमंडळात अॅड. कैलास मोरे, रंजन दातार, राजेश लाड, दीपक बेहरे, हरिश्चंद्र यादव, कृष्णा जाधव, विद्यानंद ओव्हाळ, स्विटी बार्शी, लोकेश यादव, सुनिल मोरे, मुकुंद भागवत यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीच्या आश्वासनांनंतर काहीही बदल झाला नाही. वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. नागरीकांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. कामांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, एक्सप्रेस फिडरसंदर्भात नगरपरिषद प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचा आरोपही समितीने केला आहे.
समितीने स्पष्टपणे सांगितले आहे की, साखळी उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन संपलेले नाही. जर महावितरणने मे महिन्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत, तर पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणवर असेल. ही धडक मोहीम केवळ सुरुवात आहे, असा इशारा समितीने दिला असून, नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी इन्कमर बंद झाला होता, त्यावेळी फॉल्ट सापडण्यात वेळ गेला. तांत्रिक बिघाड झाले होते. आता वीज पुरवठा पूर्ववत होत आहे. कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारा वंजारवाडी फिडर कधीच बंद नव्हता. नगरपालिकेच्या अखत्यारीत काहीतरी दोष असल्याने शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसावा. नगपरिषदेला एक्सप्रेस फिडरसाठी एस्टिमेट मान्य करून दिले आहे. एक्सप्रेस फिडरचे काम करून घेणे नगरपालिकेची जबाबदारी आहे.
चंद्रकांत केंद्रे,
उपअभियंता, महावितरण
महिनाभरात प्रलंबित कामे करून घ्यावीत, जर प्रलंबित काम केली नाही आणि गेल्या वर्षीसारखा जर लाईटचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला, तर नागरिकांचा संयम आता संपलेला आहे. नागरिक कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सहन करणार नाहीत आणि याच्या पुढचे आंदोलन हे लोकशाही किंवा सनदशीर मार्गाने नसेल, लोकांचा उद्रेक झालेला आहे आणि मग जो काय लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल, त्याला पूर्णपणे जबाबदार महावितरण राहील.
अॅड. कैलास मोरे,
कर्जत वीज ग्राहक संघर्ष समिती







