कर्जतकर धावले कन्याथॉन मॅरेथॉन

‘रन फॉर हर’ मध्ये 2000 स्पर्धकांचा सहभाग

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जतमध्ये ‘रन फॉर हर’च्या निमित्ताने आ. महेंद्र थोरवे प्रतिष्ठान आणि विजयभूमी विद्यापीठ यांच्या माध्यमातून कन्याथॉन मॅरेथॉनचे आयोजन केले होते. मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून या कन्याथॉन मॅरेथॉनसाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान, एक धाव मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या आरोग्यासाठी, मुलींना सक्षम, आणि एक धान्य मुलींच्या उज्ज्वल भविष्यसाठी या संक्लपनेवर आधारित कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये तब्बल दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

12 मार्च रोजी कन्याथॉन मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पोसरी येथील शिवतीर्थ बंगला येथे या कन्याथॉन मॅरेथॉनचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिश पॉईंट निश्‍चित करण्यात आला होता. सकाळी साडे सहा वाजता या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी विजयभूमी विद्यापीठाचे प्रमुख संजय पटोदा, कल्पना पटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. तर स्पर्धेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दूरे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कर्जत मुरबाड रस्त्यावरील पोसरी येथे स्टार्टींग पॉईंटवर सकाळपासून स्पर्धकांची गर्दी होती. त्यात मुंबई पोलीसपासून कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसचे मालक, डॉक्टर मंडळी तसेच शालेय विद्यार्थी आणि जिल्ह्यातील मॅरेथॉन प्रेमी यांनी गर्दी केली होती.

‘रन फॉर हर’च्या निमित्ताने कन्याथॉन मॅरेथॉनला सकाळी सुरुवात झाल्यांनतर पोसरी ते कर्जत चार फाटा या दरम्यान रस्त्यावर पांढर्‍या रंगाच्या टोप्या परिधान केलेले तरुण, तरुणी आणि ज्येेष्ठ धावताना आणि चालताना दिसत होते. कर्जत चार फाटा येथून पुन्हा पोसरी अशी कन्याथॉन मॅरेथॉन असल्याने क्रीडापटू यांच्या धावण्याची हा रस्ता सकाळी गजबजून गेला होता.

Exit mobile version