| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारात कर्जत तालुक्यातील शेतकरी मंगेश दत्तायत्र सावंत यांनी मोहोर उमटविली आहे. मंगेश सावंत यांनी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते आणि पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.नाशिक येथे कृषी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या सोहळ्यात राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शेतकर्यांना स्वतःचे हाताने जेवण वाढले.
कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायत मधील सोलनपाडा गावात मंगेश दत्तात्रय सावंत हे उच्चशिक्षित शेतकरी कुटुंब राहते. त्याच्याकडे स्वतःची सव्वा दोन एकर जमीन असून त्या जमिनीमध्ये सावंत कुटुंब वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेत असतात. शेतकर्यांना शेतीस पुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन करतात. प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत व कृषि विभाग यांचे व्दारे घेतली जाणारी प्रशिक्षणे, चर्चासत्रे तसेच शिवार फेरी यामध्ये नियमीत सहभागी होऊन इतर शेतकर्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी राज्यातील विविध भागांतील अभ्यास दौर्यामध्ये तसेच आतंरराज्य अभ्यास दौयामध्ये सहभाग घेतला आहे. गुजरात राज्यामध्ये अभ्यास दौरा पूर्ण करून नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले आहे.
खरीप 2017 मध्ये भात पीक स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर हेक्टरी 193 किंटल उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर जिल्हास्तरावरील भात पीक स्पर्धेमध्ये हेक्टरी 132 किंटल उत्पादन मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. आपल्या शेतात हंगामानुसार पिके यांची लागवड करून त्यातून चांगले उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. शेतमालाची विक्री स्वतः स्थानिक बाजारपेठांमध्ये करतात. तर भाजीपाला पिकामध्ये त्यांनी भेंडीची निर्यात केली आहे. घाटमाथ्यावर होणारी फराबजी तसेच राजमा यांचे पीक घेतले आहे. दुग्धजन्य पदार्थाची निर्मीती करून स्वतः विक्री करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली होती. हा पुरस्कार सोहळा राज्याचे राजपाल यांचे हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य विधानसभा उपाध्यक्ष झरवळ, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदींच्या उपस्थितीत नाशिक येथील रेडिसन ब्लु या तारांकित हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमात देण्यात आला आहे. कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगेश सावंत यांच्या त्या पुरस्काराबद्दल विशेष सन्मान केला.