10 मे रोजी निवडणुका, 13 मे रोजी निकाल
। कर्नाटक । वृत्तसंस्था ।
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात 10 मे रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 20 एप्रिलपासून नावनोंदणी सुरू होईल. 21 ते 23 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रांचा आढावा घेतला जाणार आहे. 24 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. तसेच निष्पक्ष निवडणुका घेणं हे आमचं ध्येय आहे. कर्नाटकात 5.22 कोटी मतदार आहेत. नवीन मतदार जोडण्यावरही आमचा भर आहे. ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. राज्यात 80 वर्षे वयोगटातील 12.15 लाखांहून अधिक मतदार आहेत. 276 मतदार 100 वर्षांवरील आहेत. निवडणूक आयोग त्यांच्यासाठी विशेष मदत करेल. एकूण 5.21 कोटी मतदार असून त्यापैकी 2.62 कोटी पुरुष आणि 2.59 कोटी महिला आहेत. तसेच राज्यात एकूण 42,756 ट्रान्सजेंडर आहेत, त्यापैकी 41,000 नोंदणीकृत आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 58 हजारांहून अधिक मतदान केंद्रं असतील. त्यापैकी 28,866 शहरी मतदान केंद्रं असतील. 1,300 हून अधिक मतदान केंद्रं केवळ महिलांसाठी असणार आहेत. 100 बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत, असंही आयोगानं सांगितलं.