युवराजचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
| शिवामोंगा | वृत्तसंस्था |
कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचताना युवराज सिंगने केलेला 25 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. 19 वर्षांखालील कूच बिहार राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 636 चेंडूंत नाबाद 404 धावांची खेळी साकार केली. भारतीय क्रिकेटचे विश्व गाजवणाऱ्या युवराजने पंजाब संघातून खेळताना 1999 मध्ये बिहारविरुद्धच्या अंतिम सामन्यात 358 धावा फटकावल्या होत्या. त्या बिहार संघातून महेंद्रसिंग धोनी खेळत होता.
19 वर्षांखालील गटातील देशाच्या या प्रमुख स्पर्धेत सर्वाधिक नाबाद 451 धावांचा विक्रम महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर आहे त्याने आसामविरुद्ध 2011-12 मध्ये ही खेळी साकार केली होती. चर्तुर्वेदी अंतिम सामन्यात सर्वाधिक खेळी करणारा फलंदाज ठरला . या नाबाद 404 धावांत त्याने 45 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्या या विक्रमी खेळीमुळे कर्नाटकने 8 बाद 890 धावा केल्या. त्या अगोदर मुंबईचा डाव 380 धावांत बाद झाला होता. हा सामना अनिर्णित राहिला असून कर्नाटकने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजेतेपद मिळवले. चतुर्वेदीने चारशे धावांचा टप्पा पार केल्यानंतर कर्नाटकने आपला डाव घोषित केला.