| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंड राज्य अध्यक्ष विनय सिंह यांची जमशेदपूरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विनय सिंह यांच्या हत्येनंतर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिमना रोड आणि राष्ट्रीय महामार्ग रोखला. मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीच्या परिसरात हा हल्ला झाला. विनय सिंह एका खासगी कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र, हल्लेखोर आधीच दबा धरून बसले होते. विनय सिंग गाडीतून उतरताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि घटनेनंतर ते पळून गेले. सध्या परिसरात तणाव आहे आणि पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.