। पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत सुधागड तालुकास्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा दि.19 व 20 डिसेंबर या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेत पेडली केंद्रातील आसरे कासारवाडी शाळेने दमदार कामगिरी करीत पारंपरिक नृत्य स्पर्धेत तालुक्यात मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर, आसरे कासारवाडी शाळेला जिल्हास्तरापर्यंत जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच, लंगडी या स्पर्धेतदेखील मुलींनी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, वरिष्ठ विस्तार अधिकारी साबळे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका पारखे मॅडम, उपशिक्षक ठोंबरे, अडसूळ, उप्पार यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच, पेडली केंद्राचे केंद्रप्रमुख राणे आणि उमटे उपस्थित होते.